मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. तसंच छगन भुजबळ, शशिकांत शिंदे हे नेते देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. काही वेळाआधी राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार तातडीने सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या निवड समितीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. निवड समितीचा हा निर्णय शरद पवार यांना कळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्हर ओकवर दाखल झाले आहेत.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, शशिकांत शिंदे हे नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. निवड समितीचा निर्णय हे नेते शरद पवार यांना कळवणार आहेत.
राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. पहिला म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आला आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.
‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं. पण या सगळ्यात अजित पवार यांचा मात्र वेगळा सूर पाहायला मिळाला. “नवा अध्यक्ष पक्षाला मिळत असेल तर तुम्हाला का नको आहे?”, असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता. त्यामुळे निवड समितीच्या या निर्णयानंतर अजित पवार यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.