मुंबई | 16 जुलै 2023 : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला जात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा घटनाक्रम कसा होता? या भेटीवेळी काय-काय घडलं? जाणून घेऊयात… मुंबईत आज पार पडणार अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे देखील बैठकीला उपस्थित होते.
सुरुवातीला पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित गटाची ही महत्वाची बैठक होत असल्याचं बोललं गेलं मात्र थोड्याच वेळात हे सगळे मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दिशेने निघाले. सगळे मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झाले.
यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवार आणि सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. तिथे या सगळ्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीचा प्रसंग सांगितला आहे. शरद पवार यांना आपण वारंवार विनंतीही केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री काही वेळाआधी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले होते.
आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांची वेळ न मागता आम्ही आलो. त्यांना भेटलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
आमच्या मनात पवार साहेबांबद्दल आदर आहे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा. आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी विनंती त्यांना केली, असं प्रफुल्ल पटेल सांगितलं आहे.
शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आमची मतं जाणून घेतली. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
आज अजित पवार यांच्यासोबतचे आमदार पवार साहेबांना भेटायला आले. ही घटना अनपेक्षित घटना होती. याचा कधी विचार केला नव्हता. त्यामुळे यावर आताच भाष्य करणं संयुक्तिक वाटत नाही. सर्वजण बसल्यानंतर या भेटीवर चर्चा करू आणि पुढची दिशा ठरवू. या भेटीत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.