मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटाच्या नेत्यावर प्रतिक्रिया देताना थुंकले. यावरून सध्या राजकारण तापलं आहे. त्यातच स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जुन्या विधानाचा दाखला दिला आहे. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राऊत यांच्या या वक्तव्याचे सध्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत.
संजय राऊत मोठे नेते आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. जर माझंच काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनावर घेता, असं अजित पवार म्हणालेत.
धरणात XXपेक्षा थुंकलेलं कधीही बरं! संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमीनीवर उभे आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. पक्षाबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा तसंच संकटं येत आहेत म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा आमच्या मनात विचार सुद्धा येत नाही, असं संजय राऊत म्हणाले. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीबाबत वक्तव्य केलं. यावरही अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांची आधीपासूनच राष्ट्रवादीबाबतची वेगळी मतं आहेत. मागच्या निवडणुकीत देखील आम्ही काँग्रेस वंचित आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आलं नाही. आंबेडकर हे वंचितचे नेते आहेत. त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण त्यांचं आमच्या पक्षाबद्दल त्यांचं वेगळं मत आहे, हे आम्हाला वारंवार जाणवतं, असं अजित पवार म्हणालेत.
दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “103 दिवस जेल मध्ये राहिल्यावर डोक्यावर परिणाम नक्की होतो. ज्यांना आम्ही सर्वज्ञानी म्हणतो, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्याचाच परिणाम आता पाहायला मिळतोय कुठे थुंकणं कुठे बोलणं. सकाळपासून जी गटारगंगा चालू होते ती दिवसभर चालूच राहते. त्यांना आणि त्यांच्या कृत्यांना आम्ही फार सिरीयसली घेत नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.