मुंबई : जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. काल एवढा चांगला वाढदिवस साजरा होत असताना मनसैनिकांची खोडी काढण्याची काय गरज आहे? राज ठाकरे यांच्याविषयी बोलण्याची जितेंद्र आव्हाड यांचे पात्रता नाही. उद्या मनसे सैनिकांचा संयम तुटला तर तुम्हाला इकडे तिकडे जाणं पळना मुश्कील होईल, असं म्हणत मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र सैनिक जोपर्यंत शांत आहे तोपर्यंतच आहे उगाच माती भडकवू नका. जितेंद्र आव्हाड यांनी हा थिल्लरपणा बंद करावा. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलल्यानंतर त्यांना चार दिवस फेम मिळतो. नागाने फणा काढल्यासारखा जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा आहे. उगाच महाराष्ट्राच्या उकिरड्यावर सतत बोलत असतात. त्यांनी आता शांत राहावं अन्यथा त्यांना महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असं खोपकर म्हणालेत.
महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यावरती गल्लीत बसून चहा पीत अशा प्रकारची वक्तव्य करणारे जितेंद्र आव्हाड यांना शोभतं नाही. जितेंद्र आव्हाड यांना लोक सिरियसली घेत नाहीत. कुठल्यातरी गल्लीच्या कोपऱ्यावरती बसून त्या ठिकाणी टपल्या मारत बसायच्या हे धंदे बंद केले पाहिजत, असा इशाराच अमेय खोपकर यांनी दिला आहे.
राज ठाकरेसाहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उत्साहाचा दिवस आहे. त्याच्यात मिठाचा खडा घालायचा यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी विघ्नसंतोषी माणसं जन्माला आलेली आहेत. त्यांना कधीही दुसऱ्याचा उदो उदो झाल्याचा आवडत नाही, असं अमेय खोपकर म्हणालेत.
सध्या राजकारणात चिखल झालेला आहे. आताच्या काळामध्ये लोकांना राज ठाकरे यांच्यावरती जास्त विश्वास आहे. मुख्यमंत्रिपदाची छबी ही राज ठाकरे यांच्याकडे आहे. राज ठाकरे कधी मुख्यमंत्री होतात. त्याच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत, असं ते म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनीही उत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना लवकरच मनसेची ब्लू प्रिंट पाठवणार आहोत. चार खासदार असणारे पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहतात आणि आमच्यावर टीका करतात, असं ते म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड पदवीधर निवडणुकीसाठी नाक घासत शिवतीर्थवर पाठिंबा मागण्यासाठी आले होते. कार्यकर्त्यांना घरी आणून मारहाण करणं, ही जितेंद्र आव्हाड यांची अक्कल आहे. त्यामुळे त्यांनी नक्कलवर बोलू नये. ज्यांनी स्वतःच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमावला आहे ते आमच्यावर बोलतायेत. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गजानन काळे यांनी टीका केलीय.