मुंबई 13 जुलै 2023 : मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून युतीमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील युती सरकारमध्ये काहीतरी मोठं कांड होणार आहे, असं ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. तसंच बच्चू कडू आणि त्यांच्या नावाभोवती असणाऱ्या मंत्रिपदाच्या चर्चा यावरही चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज आहे. असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे. हनुमानाची शपथ घेऊन सांगतो सरकारमध्ये काहीतरी मोठं कांड होणार आहे, असं खैरे म्हणालेत.
मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. पण विस्तार लांबणीवर पडला आहे. कारण हे सरकार अस्थिर आहे. सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. जनतेचे प्रश्न खोळंबलेले आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
सरकार पडेल की नाही हे माहीत नाही. पण हे सरकार अस्थिर आहे. एवढं मात्र सांगू शकतो, असं खैरे म्हणालेत. पकडून-पकडून, रडत-पडत हे लोक सरकार चालवतीलही. पण अनेकांची नाराजी सध्या वाढत आहे, असं खैरेंनी म्हटलं आहे.
बच्चू कडू म्हणाले त्यानुसार भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युतीमधील वातावरण खराब आहे. बच्चू कडू प्रामाणिक नेते आहेत. ते स्वाभिमानी पण आहेत. पण त्यांचा वापर करून घेतला जात आहे, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी बच्चू कडू यांच्या झालेल्या कोंडीवर भाष्य केलंय.
आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दाखवलं. तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. पांचटपणा बच्चू कडूला जमत नाही. आम्हाला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात स्थान दिलं. मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगतलं. त्यावर चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उध्दव ठाकरे चांगले नेते आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी भूमिका घेतात. उद्धव ठाकरे हे शब्द पाळणारे आहेत, हे आता लक्षात येत आहे. बच्चू कडूंना धन्यवाद देतो. त्यांना आज कळालं उद्धव ठाकरे किती चांगले आहेत. त्यामुळे उद्धवजी यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत.
संजय शिरसाठ रोज रोज बडबड करतात. त्यामुळे त्यांना का घ्यायचं असं वाटलं असेल, संजय रायमूलकर बडबड करत नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांना संधी दिली जाईल, असं विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.