मुंबई | 16 जुलै 2023 : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी अचानकपणे अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्री या ठिकाणी आले. शरद पवार यांची अचानकपणे भेट घेतली. या भेटीची राज्याच्या राजकारणात चर्चा होत आहे. या भेटीतील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकूयात…
मंत्री छगन भुजबळ हे जेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहोचले तेव्हा त्यांनी शरद पवार यांना विनंती केली. विठ्ठला आम्हा साऱ्यांना सांभाळून घे…, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना गळ घातली.
यशवंतराव चव्हाण सेंटरवरील या भेटीत आणखी एक घटना घडली. मंत्री संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या पाया पडले. याचीही राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
अजित पवार गटांकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र शरद पवार यांनी या सगळ्याला प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती आहे.
आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांची वेळ न मागता आम्ही आलो. पवारसाहेबांना भेटलो. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले आमच्या मनात पवार साहेबांबद्दल आदर आहे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा. आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी विनंती त्यांना केली असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
शरद पवारांनी म्हणणं ऐकून घेतलं. मतं जाणून घेतली. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांनी जरी या सगळ्याला प्रतिसाद दिला नसला तरी येत्या काळात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं असेल.
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्यामुळे पवार कुटुंबात आणि एकूणच राष्ट्रवादीत फूट पडल्याचं बोललं जात होतं. मात्र दोन दिवसाआधीही प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते. त्यावेळी आमचं कुटुंब एकत्रित आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवाय आजही मुंबईत ही भेट झाली. जरी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा मार्ग निवडला असला तरी त्यांनी मागच्या पंधरा दिवसात दोनदा पवारांची भेट घेतली आहे.