नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या निकालाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. कोर्ट जी ऑर्डर देणार त्या ऑर्डरचं देशातील नागरिक पूर्ण सन्मान करणार. जो व्यक्ती संविधानावर लोकशाहीवर विश्वास ठेवतो तो संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरही विश्वास ठेवतो, असं नार्वेकर म्हणालेत.
अध्यक्ष म्हणून मी जबाबदरीपूर्वक काम करत आहे. केवळ उद्यासाठीच नव्हे तर अध्यक्ष झाल्यापासूनच जबाबदारीने काम करतोय. मी कायमचा परदेशात जात नाहीये. दोन ते तीन दिवस फक्त जात आहे, त्यामुळे सुनावणी आणि सर्व व्यवस्थित पार पडेल, असंही नार्वेकर म्हणालेत.
16 आमदारांना अपात्र केलं गेलं तत्कालिन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा 16 आमदारांना अपात्र केलं गेलं तेव्हा मी कुठल्या आकसापोटी हा निर्णय घेतला नाही. तर कायद्याच्या आधारेच या आमदारांना अपात्र केलं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की मी दिलेला निर्णय न्यायदेवता मान्य करेन, असं झिरवळ म्हणाले आहेत.
सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्या निकाल लागणार आहे तर आता 24 तास थांबायला पाहिजे. आता निर्णय लवकर देणार आहे. एवढे महिने आपण थांबलेलो आहे. तर आणखी 24 तास थांबूयात. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
सत्ता संघर्षाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण उद्या होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनेलवरून थेट प्रक्षेपण होणार होणार आहे. सर्वोच्च न्यायलयातील कामकाज माध्यमांना थेट प्रक्षेपण दाखवता येणार आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून थेट प्रक्षेपण सुरू होणार आहेत. दिल्ली सरकारविरुद्ध उपराज्यपाल खटला आणि महाराष्ट्र सत्ता संघर्ष खटला हे दोन्ही निकाल उद्या सुप्रीम कोर्ट देणार असल्याची माहिती आहे.