Aapan Bolun Nighun Jaych : आपण बोलून निघून जायचं…; कवी किशोर कदम यांची कविता तुफान व्हायरल

| Updated on: Sep 16, 2023 | 9:35 AM

Kishor Kadam Viral Poem : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हायरल व्हीडिओवर कवी सौमित्र यांची राजकारण्यांना अंतर्मुख व्हायला लावणारी कविता; सोशल मीडियावर व्हायरल. किशोर कदम आपल्या कवितेत म्हणतात,आपल्याला काय? आपण बोलून निघून जायचं...

Aapan Bolun Nighun Jaych : आपण बोलून निघून जायचं...; कवी किशोर कदम यांची कविता तुफान व्हायरल
Follow us on

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : कविता जगण्याचं मर्म सांगते… जे अनेकदा आपल्याला उघडपणे बोलता येत नाही किंवा बोललो तरी ते तितक्या ताकदीने समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचेनचं असं नाही. पण तेच कवितेतून मांडलं तर ते अधिक प्रभावीपणे पोहोचतं. समाजात सुरु असलेल्या घडामोडींवर कविता मार्मिक भाष्य करते. सामाजिक-राजकीय घडामोडींवर कविता उघड भाष्य करते. सध्या अशीच एक कविता तुफान व्हायरल होत आहे. ही कविता आहे, कवी किशोर कदम यांची. आपल्याला काय? आपण बोलून निघून जायचं…  ही कविता सोशल मीडियावर आणि विशेषत: फेसबुकवर व्हायरल होतेय. ही कविता अनेकांनी आपल्या वॉलवर रि-शेअर केलीय.

व्हायरल व्हीडिओ अन् कवितेचा मतितार्थ

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी येत असतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाल आहे. या व्हीडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे आपल्याला जे बोलायचं ते बोलून मोकळं व्हायचं, असं म्हणताना दिसतात. हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला. यावरून सरकारवर टीका केली जात आहे. यावरच आधारित किशोर कदम यांची ही ‘आपण बोलून निघून जायचं’ ही कविता आहे. यातून त्यांनी राजकारणी मंडळींना अंर्तमुख करायला भाग पाडलं आहे. त्यांची ही कविता खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. किशोर कदम हे प्रसिद्ध कवी आणि अभिनेते आहेत. त्यांच्या कवितांचा मोठा चाहता वर्ग आहे. किशोर कदम हे ‘सौमित्र’ या नावाने लेखन करतात.

कवी किशोर कदम यांची कविता

आपण बोलून निघून जायचं ..

होईल जनतेचं जे व्हायचं

आपल्याला काय..

आपण बोलुन निघुन जायचं…

आपल्याला काय..

केवढी जनता असते समोर

आपल्या जीवाला नस्ता घोर

सगळेच पक्ष लावतात जोर

कोण साधून् कोण चोर

आपली तशीच विचारधारा

जिकडे जसा वाहिल वारा

घालत राहायच्या येरझारा

जातोच निसटुन हातुन पारा

हेच लक्षण लक्षात ठेऊन

आपण येत जात ऱ्हायचं

तहाने सारखं व्याकुळ व्हायचं

जकडे झरा तिथलं प्यायचं

आपल्याला काय…

आपण पिउन निघुन जायचं

आपल्याला काय…

लोकांची पण सहनशक्ती

आपण ताणुन बघत नुस्ती

लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती

कैसा गांव कैसी बस्ती

आपलेच सगळे कार्यकर्ते

आपले कर्ते आपले धर्ते

जिधर घुमाव उधर फिरते

त्यांच्या हातात काय उरते

उद्या परवा विचार करू

नंतर त्यांना काय द्यायचं

आधी बघू काय खायचं

लोकशाहीचंच गाणं गायचं

आपल्याला काय..

आपण गाउन निघुन जायचं

आपल्याला काय..

चोविस तास बातम्या मिळोत

चॅनल्स जाहिराती गिळोत

न्याय अन्यायाशी पिळोत

एफबी इन्स्टा सारे फळोत

खड्डे सगळे तसेच सडोत

निकाल लांबणीवरती पडोत

नशिबाशी कामं अडोत

नको तशा घटना घडोत

जे जे हवं ते ते द्यायचं

तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं

कशालाही नाही भ्यायचं

आपल्याला काय..

वचनं देउन निघुन जायचं

आपल्याला काय..

रोज लोकां समोर यायचं

रोज लोकां समोर जायचं

माईक बंद चालू असो

आपण फक्तं बोलत ऱ्हायचं

आपल्याला काय…

सौमित्र.