मुंबई : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात युती आणि आघाडीत कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने मविआचं जागा वाटप कसं होणार, याबाबत चर्चा होत होती. आता महाविकास आघाडी लोकसभेसाठीचा फॉर्म्युला समोर आला आहे.
विरोधक कायमच महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याची टीका करतात. शिवाय तिन्ही पक्षांना समान वागणूक मिळत नसल्याचं बोललं जातं. या सगळ्या टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने एक प्रस्ताव पुढे केला आहे.
लोकसभेसाठी समसमान जागा लढवण्याबाबत महाविकास आघाडीत चर्चा झाली आहे. 16-16-16 जागांच्या फॉर्मुल्याबाबत काँग्रेस आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटप समान झाल्यास एकत्र असल्याचा संदेश जाईल अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे, अशी माहिती आहे.
महाविकास आघाडी म्हणून 2024 ची निवडणूक एकत्र लढायची असल्यास समसमान जागा वाटप व्हायला पाहिजे. यामुळे जनतेत एकता आणि समानतेचा संदेश जाईल. शिवाय तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने जास्तीत जास्त जागा निवडून येतील, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
आता जरी काँग्रेसचा एकच खासदार असला तरी भविष्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल. त्यासाठी समसमान जागा वाटप झाल्यास ते महाविकास आघाडीसाठी फायदेशीर राहील, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
या प्राथमिक फॉर्म्युलासह एक दोन जागांचा कोटा कमी करण्याबाबत महाविकास आघाडीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2019 ला भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी तयार केली. त्यानंतर होणारी ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत जागा वाटप कसं होणार? याकडे सर्वांचंच लक्ष होतं. 16-16-16 चा फॉर्म्युला या निवडणुकीसाठी समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका परिस्थिती पाहून लढू, असं नाना पटोले म्हणालेत. काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं पटोले यांनी सांगितलं आहे.