मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : आज दुपारी तीन वाजता शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात थेट विधानसभा सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ही तक्रार केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ही तक्रार केली आहे.संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्याविरोधात नितेश राणे यांनी विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल दिली आहे. तसं पत्र नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना लिहिलं आहे. हे दोघे विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रति,
मा. सचिव,
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
विधान भवन, नरीमन पॉइंट,
मुंबई.
विषय: म.वि.स. नियम 274 अन्वये सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे
यांच्याविरुध्द विशेषाधिकार भंगाची सूचना.
महोदय,
श्री. संजय राऊत, राज्यसभा सदस्य, यांनी नजिकच्या काळात मा. विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात पुढील वक्तव्ये केली.
1. ‘’संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक
पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?’’
2. ‘’आम्ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती
बादशाही बुडाल्याशिवाय रहाणार नाही.’’
3. ‘’विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत.’’
श्री. अंबादास दानवे, वि.प.स., विरोधीपक्ष नेता, विधान परिषद यांनी मा. विधानसभा
अध्यक्षांच्या संदर्भात पुढील प्रमाणे वक्तव्य केले. ‘’उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करीत आहेत.’’
मा. अध्यक्ष, विधानसभा यांच्यासमोर सध्या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्ये उपरोक्त दोन्ही व्यक्तींचे राजकीय हितसंबंध आहेत. या पार्श्वभूमीवर वर नमूद वक्तव्ये करुन त्यांनी मा. विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्याची कृती केली असून त्याद्वारे मा. विधानसभा अध्यक्षांचा व पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे.यांचे अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे व त्या अनुसार कारवाई करावी अशी मागणी करतो.
वर नमूद वस्तुस्थिती पहाता सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्काळ सुपूर्द करावे व ह्यावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे , ही विनंती.
आपला,
(नीतेश नारायणराव राणे)
वि.स.स.
— nitesh rane (@NiteshNRane) September 25, 2023