मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. नितेश राणे यांनी एटीएस प्रमुखांना याबाबत पत्र लिहिलं आहे. संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हिंसाचार होईल, असं वक्तव्य केलं. त्यावर नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांचे देशविरोधी संघटनेशी संबंध असावेत. त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी या पत्राच्या माध्यमातून एटीएसकडे केली आहे.
प्रति,
श्री. सदानंद दाते ए. टी. एस (ATS) प्रमुख, महाराष्ट्र राज्य,
महोदय,
अयोध्या प्रभू श्री राम जन्मभूमीचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेतून शांततेत सोडविला गेलेला असताना आणि आता मंदिर उभारणीचा संकल्पही सर्व जाती धर्माच्या सहकार्याने आनंदाने पुर्णत्वास जात आहे. लोकार्पण सोहळ्याची तारीख जस जशी जवळ येत आहे, तसे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. अशावेळेस वारंवार सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करत आहेत. त्यात सर्वात अग्रक्रमी राज्यसभेचे खासदार व सामना वृतपत्राचे संपादक संजय राऊत हे मे २०२२ पासून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील अशा वारंवार जाणीवपूर्वक बातम्या माध्यमांतून पसरवित आहेत.
संजय राऊत यांच्या या पूर्वीच्या विधानानंतरच संपूर्ण महाराष्ट्रात ठीकठिकाणी अचानक काही लोकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटस म्हणूनही ठेवले आहेत, त्यामुळे विविध भागात दंगलीसुद्धा घडलेल्या आहेत. काल सोमवार दि. २८ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांनी माध्यमांपुढे पुन्हा जाणीवपूर्वक विधान केले की “श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्माधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोधा घडवलं गेलंय असं म्हटलं जातंय. त्यामुळे अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल.” त्यामुळेच त्यांचे हे विधान मला चिंतेत टाकणारे वाटत आहे. मला खात्री आहे की देशविरोधक संघटनेशी त्यांची जवळीक असावी आणि भारत देशाविरुद्ध संभाव्य कटकारस्थान रचल्या जाणान्या षढयंत्रांचा भाग असावेत म्हणूनच त्यांना संभाव्य दंगलीची एवढी सखोल माहिती आहे हे नाकारता येत नाही.
संजय राऊत यांच्यावर यापूर्वी मनी लॉड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल आहे व त्या गुन्हयासाठी ते एक वर्ष कारागृहात होते. तसेच पाकिस्तानची तारीफ करणाऱ्या प्रवृत्तींना ते आपला आजमितीस सातत्याने आदर्श मानत आलेले आहेत. आपणास माझी विनंती आहे की, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने विनाविलंब ठोस कारवाई करावी आणि त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आवश्यकता वाटल्यास, न्यायलयीन प्रक्रीयेतून त्यांची नार्को टेस्टही करावी जेणेकरून दहशदवादी संघटनाचे जाळे संपूर्णतः नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल.
“जय हिंद, जय महाराष्ट्र”
आपला,
नितेश नारायणराव राणे
Gaddar ! pic.twitter.com/SJR2fbVrL0
— nitesh rane (@NiteshNRane) August 30, 2023