मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत बंड केलं. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत ते युतीत सामील झाले. त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार त्यांच्या समर्थकांसह सरकारमध्ये सामील झाले. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. देणाऱ्याचे हात घ्यावेत, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. मिंधे-अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले, असं म्हणत शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही, असे निरीक्षण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तरीही फुटिरांच्या हाती पक्ष व चिन्ह सोपवणे हाच हुकूमशाहीपद्धतीचा कारभार आहे. अशा निवडणूक आयोगासमोर शरद पवार यांना हुकूमशहा ठरवले जाते व उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. ठाकरे – पवार यांच्या कारभाराने अनेक दगडांना शेंदूर फासून त्यांना देवत्व दिले. पण मिंधे – अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले व देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवून मोकळे झाले.
शरद पवार हे हुकूमशहा आहेत व त्यांनी घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, असा युक्तिवाद अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केला. पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाने दावा सांगितला व निवडणूक आयोग अजित पवारांचा युक्तिवाद ऐकून घेत आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष हजर होते व अजित पवारांचे वकील ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच’ असे नरडे ताणून सांगत होते. निवडणूक आयोगासमोर शिवसेनेच्या संदर्भात हेच घडले. एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंधे गटाने शिवसेनेवरच दावा सांगितला व निवडणूक आयोगाने तो मान्य केला. निवडणूक आयोगाची ही मनमानी आहे.
एखाद्या पक्षातून काही आमदार किंवा खासदार फुटल्याने पक्ष त्यांच्या मालकीचा होत नाही. आज त्यांना पक्ष व चिन्ह दिले व हे सर्व आमदार-खासदार उद्या निवडणुकीत पराभूत झाले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे तेथेच बारा वाजतील. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली तशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. याच दोन्ही पक्षांनी शिंदे व अजित पवारांसारख्यांना पदे दिली. त्यामुळे मूळ पक्ष महत्त्वाचा.
शरद पवार हे घर चालवल्याप्रमाणे पक्षाचा कारभार चालवतात असे अजित पवार म्हणतात. पक्ष घरातलाच असल्यामुळे अजित पवार चार-पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकले व श्री. शरद पवार यांचा वरदहस्त होता म्हणूनच ‘ईडी’ने अजित पवारांना तसा हात लावला नाही. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी बेइमानी केली हे ठीक, पण त्यांनी मातृपक्षावरच दावा सांगितला ही लफंगेगिरी म्हणावी लागेल.