मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून व्हायब्रंट गुजरातवर भाष्य करण्यात आलं आहे. सामनाच्या रोखठोक या सदरातून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्हायब्रंट गुजरातवर टीका करण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये लागलेल्या पोस्टरवरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ‘मारू घाटकोपर’, ‘मारू मुलुंड’नंतर आता ‘मारू मुंबई’ आणि ‘मारू महाराष्ट्र पर्यंत ही वळवळ सरकू नये. महाराष्ट्राच्या विद्यमान राज्यकर्त्यांकडे कपाळ फोडून उपयोग नाही. महाराष्ट्रालाच कंबर कसून उभे राहावे लागेल!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. व्हायब्रंट गुजरातवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
मुलुंडमध्ये मराठी कुटुंबास जागा नाकारली, ‘मारू घाटकोपर’ असे बोर्ड झळकले. मुंबईत ‘व्हायब्रंट गुजरात’चे सोहळे झाले, त्यात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील उद्योगपतींनी गुजरातला यावे असे आवाहन केले. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना काही वावगे वाटले नाही, हे आश्चर्यच आहे. मुंबईचे ओरबाडणे आता नित्याचेच झाले. एक दिवस हे लोक मुंबईच पळवून नेतील. त्यासाठी मराठी लोकांत फूट पाडण्याचे कारस्थान पूर्ण झाले आहे!
मुंबईवर हक्क सांगण्याची आगळीक गुजराती लोकांनी पुन्हा सुरू केली. हे सर्व ठरवून चालले आहे. दिल्लीवर गुजराती राज्य सुरू झाल्यापासून देशभरातील आर्थिक नाडय़ा गुजराती व्यापाऱयांच्या हाती गेल्या व ते पैशांच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत आपला हक्क सांगू लागले. यामुळे ‘भारत विरुद्ध गुजरात’ असा नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. मुलुंड येथे देवरुखकर या मराठी दांपत्यास इमारतीत प्रवेश नाकारला. मराठी लोकांना आमच्या सोसायटीत जागा मिळणार नाही असे श्रीमती देवरुखकर यांना सांगण्यात आले.
चार दिवसांपूर्वी घाटकोपर येथे गुजरातीत फलक झळकले की, ‘मारू घाटकोपर’ म्हणजे आमचे घाटकोपर. हे फलक नंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकले. परळ, लालबाग, गिरगाव, दादर अशा मराठी वस्त्यांतील चाळी गिरण्यांच्या जागेवर टावर्स उभे राहिले. तेथे मराठी माणसाला प्रवेश नाही, मांसाहारी लोकांना प्रवेश नाही, असे सांगणे हा क्षत्रियांचा, मराठय़ांचा अपमान आहे. मुंबईची लढाऊ संस्कृती बदलण्याचा हा प्रकार आहे. मुंबई आज महाराष्ट्राच्या नकाशावर आहे, पण उद्योग, आर्थिक व सांस्कृतिकदृष्टया ती गुजरातच्या दिशेने निघाली आहे.
आज ती कवचकुंडले उरली नाहीत व उरलेल्या मराठी लोकांत ‘फूट’ पाडण्याचे कारस्थान पूर्णत्वास गेले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले. ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट’चे नेतृत्व त्यांनी मुंबईत केले. मुंबईतील उद्योगपतींनी गुजरातला यावे असे आवाहन त्यांनी केले. ‘गेटवे टू द फ्युचर’ असे वर्णन त्यांनी मुंबईत येऊन गुजरातसाठी केले. महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरातकडे वळविण्याच्या या कार्पामाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना काही वावगे वाटले नाही, हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, त्यात गुजरातचे हे ओरबाडणे नव्याने सुरू झाले.