मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. नव्या संसदभवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यावरूनही संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय.
मुंबईतील अत्यंत शिवडी न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पाचच्या मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणीचा सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाजूच्या सीटवर बसले होते. त्यावर राऊतांनी टीका केलीय.
लोकशाहीवादी आणि देशभक्तांना दिल्लीत बोलवत नाही. जे चमचे असतात ते चाटुगिरी करतात. जे मोदींच्या भजन मंडळात सामील झालेले असतात. त्यांनाच दिल्लीत बोलवलं जातं. जर राष्ट्रपतींनाच बोलवलं नाही तर आमचा काय उल्लेख करता? ज्यांच्या सहीने संसद सुरू होतोय लोकशाहीच्या भूमिका ते ठरवतात. त्यांना प्रधानमंत्री मोदींनी बोलवायला नकार दिलाय. मग आमच्यासारख्यांची काय अवस्था असेल. न बोलता जाणारे पंगतीमध्ये बसणारे खूप लोक असतात ते चालले असतील. आम्ही नाही, असं राऊत म्हणालेत.
हुकुमशाही नेहमी ठाम असतो. लोकशाही मार्गाने निर्माण केलेल्या प्रश्नाला हुकूमशाही उत्तर देत नाहीत. विरोधी पक्षाची भूमिका विरोधीपक्ष नसून देशभक्तीची आहे. देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा विरोध नाही. मात्र त्या उद्घाटनात देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर बसवलं असं तुम्ही म्हणता. मग तो त्यांचा अधिकार आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढच्या प्रक्रिया सुरू होतात. मात्र आपण एक पॉलिटिकल इव्हेंट म्हणून राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री याचा उद्घाटन करावं, असं भाजपने ठरवलं आहे. ते चुकीचं आहे. आमचा मुद्दा संविधानिक आणि नैतिकतेचा आहे. नवीन संसद उभारला आनंद आहे. त्याचं उद्घाटन होतंय, याचा आनंदच आहे. मात्र या निमित्ताने देशाच्या संविधानावरती हल्ला होत आहे याला आमचा विरोध आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले आहेत. त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं. नरेंद्र मोदींनी स्वतः राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करावं आणि या वादावर पडदा टाकावा, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.