ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा पराभव केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 57.15 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 6 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतदान वाढल्यानं धाकधूक वाढली. वाढलेला मतदार कोणाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या मतदारसंघात भाजपकडून मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दिना पाटील या दोघांमध्येच प्रमुख लढत झाली. मनसेनं उमेदवारी दिली नसल्यानं यावेळी इथं दुहेरी लढत झाली.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | मनोज कोटक (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | संजय दीना पाटील (राष्ट्रवादी) | |
अपक्ष/इतर | संभाजी शिवाजी काशीद (VBA) |
मुंबईतल्या रंगतदार लढतीतली एक
मुंबईतली ही जागा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. कारण तिथले भाजप खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट डावलून या ठिकाणी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. त्यामुळं मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यातनंतर सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मन जुळलेत असं दिसलं नाही.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील होते. पण त्यांची उमेदवारी जाहीर झाली तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कमतरता त्यांना जाणवली. आघाडीत जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे असली तरी मुंबईत राष्ट्रवादीचं प्राबाल्य कमी असल्यानं त्यांना त्याचा फटका बसू शकतो.
मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत 6 टक्यांनी मतदानाची आकडेवारी वाढली. हा नवमतदार दोन्ही बाजूने वळल्याचं बोललं जातं. कारण गुजराती उमेदवार दिल्यानं मराठी भाषिकांनी मराठी संजय दिना पाटील यांच्या पारड्यात वजन टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर गुजराती मतदारांनी भाजपला मोठ्या प्रमाणात साथ दिल्याची शक्यता आहे.
विधानसभानिहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची आकडेवारी
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
विधानसभा 2014 मतदान% 2019 मतदान %
मुलुंड ५८.९४ ६३.६६
विक्रोळी ५०.८५ ५७.३०
भांडूप पश्चिम ५४.४७ ५८.९९
घाटकोपर पश्चिम ४८.७२ ५५.८९
घाटकोपर पूर्व ५७.०८ ६१.२७
मानखुर्द ४०.८१ ४७.०८
एकूण ५१.६६ ५७.१५
2014 च्या निवडणुकीत मोदी आणि सेना एकत्र असल्यानं किरीट सोमय्या सहज निवडून आले. पण आता सोमय्या यांनी मातोश्रीवर थेट आरोप केल्यानं कमालीचं वितुष्ट निर्माण झालं. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यानं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यात मनसेच्या राज ठाकरेंची सभा झाल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात काम केल्याचं पाहायला मिळालं. तर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून भाजपचं काम न केल्याचा फटका मनोज कोटक यांना बसू शकतो.
2019 मधील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 15 लाख 88 हजार 343 मतदारांपैकी 9 लाख 7 हजार 768 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात 6 टक्यांची वाढ झाली. मुलुंड आणि घाटकोपर भागात जास्त मतदान झालं. तर मानखुर्द भागात सर्वात कमी मतदान झालं.
यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य, कोणाकोणाच्या सभा?
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली गेली. पण कोटक हे गुजराती आहेत. तर संजय दिना पाटील हे मराठी आहेत. त्यामुळं ईशान्य मुंबईत असलेल्या साडेसात लाख मराठी मतदारांवर इथल्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. लोकसभेच्या सहापैकी पाच मतदारसंघात शिवसेना – भाजपचे आमदार आहेत, तर एका ठिकाणी समाजवादी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे युतीची ताकद असली तरी मराठी मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकतात हे महत्त्वाचं आहे.
या मतदारसंघात मनसेची ताकद आहे. त्यामुळं मत विभाजनाचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होऊ शकतो. प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीनं या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. पण दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या सभा झाल्या. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा चांगलीच गाजली. त्यांनी मोनिका मोरे या तरुणीला स्टेजवर बोलावले. मोनिका मोरेला भाजपनं दिलेलं नोकरीचं आश्वासन पाळलं नाही असा आरोप त्यांनी केला. या मतदारसंघात मुद्द्यांपेक्षा टीका टिपण्णीवर चांगलीच चर्चा झाला. त्याशिवाय या प्रचारात सेना भाजपच्या वादाची किनारही होती.