मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या स्थापना दिवस आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेली अस्वस्थता, नाराजी अद्याप कमी झालेली नाही असंच दिसतंय.
ठाकरे गटाच्या महिला आमदार नाराज असल्याची माहिती आहे. त्या लवकरच ठाकरे गटाला रामराम करणार असल्याची माहिती आहे. शिवाय लवकरच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. त्यामुळे ठाकरे गटात नाराज असलेल्या आमदार या मनिषा कायंदे असल्याचं बोललं जात आहे.
केवळ मनिषा कायंदेच नव्हे तर तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती आहे. आज रात्री हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की तो कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो, असं संजय राऊत म्हणालेत.
शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसं पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं आहे. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका मांडली आहे. पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. पक्षात घुसमट होत असल्याचं शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.