पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वकांक्षी हायपरलूप प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेड सिग्नल दिला (Hyperloop project work stop) आहे. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. “जगात अजून कुठेही हायपरलूप रेल्वे नाही. आधी कुठे तरी होऊ द्या मग आपल्याकडे बघू,” असे सांगत अजित पवारांनी हायपरलूपच्या सर्वेक्षणाच्या कामाला ब्रेक दिला आहे.
“हायपरलूप संदर्भात अद्याप चर्चा नको. आधी ही रेल्वे जगात कुठंतरी होऊ द्या. याची ट्रायलही आपल्याकडे नको,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केलं. पुण्यात आज विविध विषयासंदर्भात अजित पवारांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे मेट्रो, पीएमआरडीए, पालखी मार्ग आढावा, आणि शिवजयंती आयोजन यावर चर्चा केली.
हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणार आहे. मात्र हजारो तरुणांना हाय-टेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज वर्तवला जात होता.
हायपरलूप म्हणजे नेमकं काय?
‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.
हायपरलूप व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकंही सोपं नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच शहराला यश मिळालेलं नाही. अबुधाबी आणि चीनमधील गिझाऊ प्रांताने ‘एचटीटी’ कंपनीची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. यूएसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंदगतीने सुरु आहे.