मुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले आहेत, लाईफलाईन असणारी लोकल रेल्वे बंद पडली आहे आणि रस्त्यांवर पाणी अजूनही साचलेलं आहे. पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्याकडूनच बेजबाबदार वक्तव्य केली जात आहेत.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. पण पाणी तुंबण्यावर महापालिकेला अनेक अनुभवांनंतरही तोडगा काढता आलेला नाही. त्यातच मुंबईकर बेहाल झालेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेरोशायरी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता दिली आहे, त्यांना लोकांविषयी सहानुभूती आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.
कुछ तो चाहत रही होगी
इन बारिश की बूँदों की भी,?
वर्ना कौन गिरता है इस जमीन पर
आसमान तक पहुँचने के बाद !— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2019
कोणतीही आपत्ती नैसर्गिक असली तरी त्यावर तोडगा काढणे आणि लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. कारण, लोकांनी आपले प्रतिनिधी मतदान करुन निवडून दिलेले असतात. दोन दिवसांपूर्वी रस्त्यांवर कंबरेपर्यंत पाणी असताना रस्त्यावर कुठेही पाणी नाही, असं अजब वक्तव्य खुद्द महापौरांनीच केलं होतं. त्यातच आता संजय राऊत यांच्या या शायरीमुळे लोकांचा संताप वाढलाय. युझर्सने संजय राऊत यांनी ट्रोलही केलंय आणि असंवेदनशीलपणावर संताप व्यक्त केलाय.
जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज : राहुल शेवाळे
लोकांना मदत करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची असते, त्यामुळे जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज असल्याचं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. मुंबईतील अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय. यामध्ये मदत करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. त्याचबरोबर संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे, असं मत राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलं. लोकप्रतिनिधीने अशा वेळी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य न करता सांभाळून वक्तव्य करावं आणि सर्वसामान्य जनतेला मदत होईल अशी भूमिका मांडावी असा सल्लाही त्यांनी दिला.