मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तेव्हा राज्याच्या विकासासाठी आपण युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यांचं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या त्याच विकासाच्या मुद्द्यावर आजच्या सामनातून टीका करण्यात आली आहे. अजितदादांचा विकास! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. अजितदादांचा हा विकास म्हणजे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान असल्याचं सामनात म्हणण्यात आलं आहे.
जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत. आता हा विकास आहे असे जर अजित पवारांना वाटत असेल तर ते शाहू , फुले , आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान करीत आहेत .
सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी , इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले . ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या गोठय़ात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की , 2024 मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे व शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ” आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील .” महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल ! सत्तेची भूक तोपर्यंत सगळय़ांनीच शमवून घ्यावी हाच सगळय़ांना प्रेमाचा सल्ला!
विकासासाठी आपण शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे. अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले?
बारामतीत जाऊन अजितदादा असेही म्हणाले की, ”मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत”. मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर झुंजवायचे हा काही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार नव्हता.
शिवसेना ही जशी मिंधे गटाची नाही तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही. शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचाच पक्ष राहू शकतो. मात्र भाजपने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ‘घाव’ घातला म्हणून तुमची ही सत्तेची ‘हाव’ पूर्ण झाली आहे, हे या पक्षांवर बेगडी दावा सांगणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तेव्हा आपल्याला सत्तेची हाव नाही वगैरे अजित पवारांचे बोलणे झूठ आहे. शिंदे व अजित पवार हे कोणत्याही उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकले हे बारामतीत त्यांच्यावर फुले उधळणारी जनताही जाणते.