मुंबई | 03 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे. या उद्धाटनाला काँग्रेसने जावं, असं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना आवाहन केलं आहे. ‘सोमनाथ ते अयोध्या, सत्य काय आहे?’ या शीर्षकाखाली आजता सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. काँग्रेसने अयोध्येत यायला हवं, असा सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. संजय राऊत यांनी दिलेला हा सल्ला काँग्रेस हायकमांड ऐकणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सोमनाथ मंदिर ते अयोध्येतील राममंदिर या प्रत्येक टप्प्यात धर्मनिरपेक्ष काँग्रेसचा सहभाग आहे. कारण श्रीराम हे देशाचे नायक आहेत. भगवान कृष्ण, प्रभू श्रीराम ही आमच्या अस्मितेची शिखरे आहेत. ‘रामराज्य’ ही संकल्पनाच महात्मा गांधी यांची होती. शिवसेनेइतकेच काँग्रेसचेही रामाशी नाते आहे. राममंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचे विशेष निमंत्रण काँग्रेसला असेल तर राजकीय मतभेद दूर ठेवून काँग्रेसनेही अयोध्येत दाखल व्हायला हवे. त्यात चुकीचे काय आहे?
राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशात बरेच काही घडत आहे. राममंदिर हा बिगर राजकीय असा धार्मिक, सांस्कृतिक सोहळा झाला असता तर उचित ठरले असते. हिंदुत्वाचा ठेका आपल्याकडेच, असे मानून 22 जानेवारीस देशात दिवाळी साजरी करण्याचे फर्मान भाजपने काढले व त्यांचे अंधभक्त प्रचारक कामास लागले. अयोध्येत राममंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने झाले. अयोध्येच्या लढ्यात लालकृष्ण आडवाणी व त्यांचे सहकारी होते. आजचे भाजपाई त्यात होते का? हा शोधाचा विषय आहे.
अयोध्या ही झांकी असून काशी – मथुरा बाकी असल्याची घोषणा या मंडळींनी आधीच ठोकली आहे. जपजाप्य, होमहवन, पूजाअर्चा, यज्ञ, अंगारे, धुपारे, भस्म-उदी अशा पुरातन युगात आपण यानिमित्ताने ढकललो गेलो आहोत. हा काही हिंदुत्वाचा आविष्कार नाही. भारत देशात हिंदुत्वाचा ठेका फक्त आपल्याकडेच आहे, असे जे भाजपचे लोक सांगतात ते सर्वस्वी चुकीचे आहे.
देशात हिंदू संस्कृती वाढावी व जतन व्हावी यासाठी काँग्रेसचेही तेवढेच योगदान आहे. काँग्रेसचा आत्मा हा तसा हिंदूच आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. काँग्रेसच्या राजवटीत मुसलमानांना त्यांचे हक्क मिळणार नाहीत म्हणून बॅ. जीना यांनी पाकिस्तान निर्माण केले. गांधी यांच्या मुखी तर रामनाम होतेच. बिर्ला यांच्या मदतीने महात्मा गांधी यांनी अनेक ठिकाणी भव्य मंदिरांची उभारणी केली. ‘रामराज्या’ची संकल्पना महात्मा गांधींनीही मांडलीच होती.