सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येणार नाहीत, अदानी समूहाने हे लक्षात घेतलं पाहिजे!; सामनातून टीका

| Updated on: Oct 14, 2023 | 8:26 AM

Saamana Editorial on Dharavi and Adani Group : ...तर 'धारावी वाचवा'चा नारा बुलंद करून रस्त्यावर उतरलेल्या धारावीकरांना पाठबळ हे द्यावेच लागेल. प्रश्न महाराष्ट्राच्या राजधानीच्या भूगोलाचा आहे; सामनातून अदानी समुहावर टीकास्त्र. धारावीच्या मुद्द्यावरून संजय राऊत आक्रमक. वाचा सविस्तर...

सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येणार नाहीत, अदानी समूहाने हे लक्षात घेतलं पाहिजे!; सामनातून टीका
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून धारावीच्या प्रश्नावर भाष्य करण्यात आलं आहे. धारावीचा लढा! या शीर्षकाखाली हा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. ‘व्हायब्रंट गुजरात’वर बोलतानाच धारावीचं ‘अदानी नगर’ होऊ द्यायचं नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. ‘धारावी वाचवा’चा नारा बुलंद करून रस्त्यावर उतरलेल्या धारावीकरांना पाठबळ हे द्यावेच लागेल प्रश्न महाराष्ट्राच्या राजधानीच्या भूगोलाचा आहे. धारावी त्या भूगोलाचा भाग आहे, असं म्हणत सामनातून धारावीच्या प्रश्नावर भाष्य करण्यात आलंय.  मराठी अस्मिता म्हणून याकडे पाहायला हवं, असंही आजच्या सामनातून संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

धारावीचा प्रकल्प बहुरंगी-बहुढंगी करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजधानीतील मराठी अस्मितेचा प्रकल्प म्हणून त्याकडे पाहायला हवे. मुंबईत अनेक मोकळ्या जागांवर सध्या ‘अदानी’चे फलक लागले आहेत. रावीचेही ‘अदानी नगर’ होईल. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे ‘व्हायब्रंट गुजरात’चे श्रीमंती दुकान होत असेल तर ‘धारावी वाचवा’चा नारा बुलंद करून रस्त्यावर उतरलेल्या धारावीकरांना पाठबळ हे द्यावेच लागेल. प्रश्न महाराष्ट्राच्या राजधानीच्या भूगोलाचा आहे. धारावी त्या भूगोलाचा भाग आहे. सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येणार नाहीत. अदानी समूहाने हे लक्षात घेतले पाहिजे!

सबकुछ ‘अदानी’ या राष्ट्रीय धोरणानुसार धारावी विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी कंपनीस मिळाले. काय, कसे ते भाजप हायकमांडलाच माहीत. धारावीचा विकास करण्यासाठी या पृथ्वीतलावर फक्त ‘अदानी’ हीच अवतारी कंपनी आहे. दुसरे कोणी नाही. त्यानुसार दिल्लीच्या आशीर्वादाने अदानी हे धारावीचा पुनर्विकास करणार आहेत. अर्थात हे कार्य धर्मादाय वगैरे नसून देशातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प म्हणून त्याकडे पाहायला हवे, पण काल ‘अदानी हटाव, धारावी बचाव’ अशा घोषणा देत हजारो धारावीकर, सर्वपक्षीय कार्यकर्ते मोर्चा काढून रस्त्यावर उतरले.

धारावीतील झोपडपट्टीधारकांनी त्या नरकातून व डबक्यातून बाहेर पडावे असे कुणाला वाटणार नाही? धारावीत एकप्रकारे संपूर्ण गरीब भारत देशच वसलेला आहे. तेथे जात-पात, धर्म-पंथाच्या भिंती तुटून पडल्या आहेत. जो तो आपल्या पोटासाठी श्रमतो व जगतो. धारावी म्हणजे श्रमिकांचा गरीब भारत देश आहे. आतापर्यंत धारावीच्या विकासाच्या अनेक योजना व प्रकल्पांच्या घोषणा झाल्या व हवेत विरल्या, पण पुनर्विकास काही झाला नाही. योग्य ‘बिल्डर’ मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला.

आता ‘अदानी’ हेच भाजपचे आर्थिक तसेच मुख्य व्यापार केंद्र असल्याने धारावीचा शेकडो एकरचा भूखंड अदानीस सहज मिळाला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात साधारण 1000 एकरवरती धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे. धारावीत लाखांवर झोपड्या व त्यात 10 लाखांहून जास्त लोक राहतात. येथील घरे म्हणजे कच्च्या झोपड्या आहेत. या वसाहतीत अनेक छोटे-मोठे लघुउद्योग आहेत. चामड्याचे उद्योग, कपडे, गार्मेंट, मातीच्या वस्तू बनविणारे कारागीर, खाद्य पदार्थ बनवून वितरण करणारे लोक शेकडोंच्या संख्येने आहेत. या लोकांना घरे मिळतील, पण त्यांच्या विविध उद्योगांच्या भवितव्याचे काय? अदानी समूहाने घरे द्यायची आहेत हे काही उपकार नव्हेत.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र गुजरातेत पळवून नेले. त्यास पर्याय म्हणून धारावीत असे आर्थिक तसेच व्यापारी केंद्र उभे राहिले तर आनंदच आहे. धारावीत कुंभारवाडा आहे हे अनेकांना माहीत नसेल. भरतकाम करणार्‍या कारागिरांची वसाहत येथे आहे. चामड्याचे उत्तम जिन्नस बनवणार्‍या चर्मकारांची वसाहत येथे आहे. त्यांच्या या उद्योगांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहती धारावीच्या नव्या प्रकल्पात व्हायलाच हव्यात.

धारावीची जमीन ही वांद्रे-कुर्ल्यास जोडून असल्याने या जमिनीस सोन्याच्या वरचा भाव आहे. त्यात रेल्वेची जमीनदेखील आहे. प्रकल्पातील एकूण जमिनीपैकी 61 टक्के जमीन ही मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे. 18 टक्के जमीन राज्य सरकार व इतर खासगी मालकांच्या मालकीची, तर 3 टक्के जमीन रेल्वेच्या मालकीची असून त्या रेल्वेच्या जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारला भुर्दंड पडणार आहे. हे सर्व त्रांगडे आहे व ते सोडवून धारावीचा प्रकल्प मार्गी लावायचा आहे.