मुंबई : मणिपूरमध्ये मागच्या महिनाभराहून अधिक हिंसाचार सुरूच आहे. त्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. “मणिपूरमधील हिंसक कारवायांच्या घटनांमध्ये कमी आली आहे, असा केंद्र सरकारचा दावा आहे. परंतु इरोसेम्बा येथे रुग्णवाहिका पेटवून त्यातील निष्पाप मायलेकाचा बळी घेण्याचा निर्घृण प्रकार या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
हिंसाचारपीडित कुकी समुदायाच्या लोकांना दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आपले भय, वेदना व्यक्त करण्याची वेळ येते याचाच अर्थ मणिपूरमध्ये जातीय विद्वेषाचा ज्वालामुखी खदखदतच आहे. मणिपूर आणि केंद्रात भाजपचेच सरकार असूनही ही ठिणगी महिनाभरानंतरही विझलेली नाही. मणिपूर आजही अशांतच आहे, असं म्हणत केंद्र सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
एका महिन्यानंतरही मणिपूरमधील जातीय भावनांचा उद्रेक कमी झालेला नाही. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. एकूण 272 मदत छावण्यांमध्ये 37 हजार 450 पेक्षा जास्त लोक सध्या तेथे राहत आहेत. हे सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संरक्षण कवचात असले तरी इरोसेम्बा येथील भयंकर घटनेने हे शरणार्थी सुरक्षित नाहीत. हे तर स्पष्ट झालेच, शिवाय माणुसकी, परस्पर प्रेम, दया यांना कुठलेच स्थान नाही हेदेखील दिसून आले, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
गेल्या आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा केला होता. त्यांनी तेथील जनतेला शांततेचे आवाहनही केले होते. त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र या प्रतिसादाचा बुडबुडा इरोसेम्बा येथील भयंकर घटनेने फुटला आहे. मणिपूर हे ईशान्य हिंदुस्थानातील एक छोटे राज्य असले तरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रांत आहे. तेथेही अतिरेकी आणि फुटीरवाद्यांचे अनेक गट पूर्वापार सक्रिय आहेत. त्यांना आपल्या शेजारी शत्रू राष्ट्रांची फूस असते. सर्व प्रकारची मदत ते या गटांना करीत असतात. त्यामुळे मणिपूर दीर्घकाळ अशांत आणि हिंसेच्या वणव्यात सापडणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारे नाही, अशी भीती सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्याही हिंसक कारवाया कठोरपणे मोडून काढण्याचे निर्देश मणिपूरमधील संबंधित यंत्रणांना देऊनही तेथील हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. मणिपूरमधील हिंसक कारवाया, जाळपोळीच्या घटनांमध्ये कमी आली आहे, असा केंद्र सरकारचा दावा आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही, परंतु मंगळवारचा इरोसेम्बा येथे रुग्णवाहिका पेटवून त्यातील निष्पाप मायलेकाचा बळी घेण्याचा निर्घृण प्रकार या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्य परत शांततेच्या रुळावर आणणे हे एक आव्हान आहे. केंद्रातील राज्यकर्ते ते कसे पेलतात यावर मणिपूरसह ईशान्य हिंदुस्थानमधील शांतता आणि स्थिरता अवलंबून आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.