मुंबई : आज अवघ्या देशाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे लागलं आहे. कारण आज देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडतंय. उद्घाटनाच्या दिवशीच सामनातून मोदी सरकारवर तोफ डागण्यात आली आहे. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज होत आहे. हे संकेत आणि परंपरेला धरून नाही. राष्ट्रपती याच देशाच्या व संसदेच्या प्रमुख आहेत. संसदेवर अशा प्रकारे ताबा मिळवणे हे लोकशाहीला घातक आहे. भाजप वगळता बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी यावर युद्ध छेडले आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग’, असे तुकोबा बोलून गेले. संतांच्या वाणीतील हे अमर सत्य आहे. रात्रंदिवस लोकशाही वाचविण्यासाठी निरंतर झगडा आपल्या देशात सुरू आहे. आज दि. 28 मे रोजी दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. संसद भवनाचे उद्घाटन कोणी करावे, याबाबत नवा वाद निर्माण झाला. नव्या संसदेचे उद्घाटन परंपरेने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी मागणी सर्वप्रथम श्री. राहुल गांधी यांनी केली व बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी ती मान्य केली. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. हे लोकशाही संकेत व परंपरेस धरून नाहीं. राष्ट्रपतींना साधे निमंत्रणही नाही, असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.
काँग्रेससह देशातील 20 राजकीय पक्षांनी संसदेच्या उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला. विरोधकांच्या बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी हे संसदेच्या उद्घाटन सोहळय़ात भाषण करतील व त्यांनीच जमा केलेला श्रोतृवृंद तेथे टाळया वाजवेल. लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका आहे. संसदेच्या उद्घाटनास देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, विरोधी पक्षनेत्यांना मान नाही. सर्व काही ‘मी’ म्हणजे मोदी. हा अहंकारच आहे, असं सामनात म्हणण्यात आलंय.
राष्ट्रपतींना त्यांच्याच अधिकारातील संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातून आता डावलले गेले आहे. राष्ट्रपतींना फक्त राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांवरची धूळ झटकायची आहे, जे काम राजीव गांधींना गावंढळ वाटलेल्या राष्ट्रपती झैलसिंग यांनी केले होते. पंतप्रधानपदावरील राजीव गांधींची झोपच झैलसिंग यांनी उडवली होती. भारतीय राज्यघटनेचा एक खांब राष्ट्रपती. त्या डोलाऱयावर आपली संसद उभी आहे, पण नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींचे साधे नाव नाही! हाच वादाचा मुद्दा आहे, असं म्हणत सामनातून या उद्घाटन सोहळ्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.