मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : केंद्रातील मोदी सरकार विरोधात ‘INDIA’ आघाडीकडून अविश्वास ठराव आणण्यात आला. यावर पहिल्या दिवशी राहुल गांधी, स्मृती इराणी, अमित शाह यांनी भाषणं केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अविश्वास ठरवावर भाषण केलं. सव्वा दोन तास त्यांनी हे भाषण केलं. यावर विरोधकांनी टीका केली आहे. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी 90 टक्के ‘INDIA’ आघाडीवर भाष्य केलं. यातच त्यांची अपरिहार्यता दिसून येते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही या भाषणावर टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणाने काँग्रेसला मोठं केलं, 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे निश्चित, ते सूर्याचे मालक नाहीत!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
अविश्वास ठरावाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत जे लांबलचक भाषण केले त्यात अहंकार, न्यूनगंड, चिडाचिड जास्त होती. मणिपूरवर ते फक्त तीन मिनिटे बोलले. मणिपूरवर त्यांचे भाष्य त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केले असते तर ‘इंडिया’ पक्षाला अविश्वास ठराव आणावा लागला नसता व मोदींना या वयात 2 तास 13 मिनिटांची चिडचिड करावी लागली नसती.
मोदींनी त्यांच्या भाषणाने काँग्रेसला मोठे केले. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे त्यांच्या भाषणाने नक्की केले. ते सूर्याचे मालक नाहीत!
मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले. ‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले. दोनेक तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत.
पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण, काँग्रेसचे स्वातंत्र्य लढय़ातील कार्य या मोदींच्या यातना आहेत व दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांतून दूर होऊ शकलेले नाहीत. मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत?
मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जात असताना मोदी पंतप्रधान आहेत व लोक मोदींना जाब विचारीत आहेत. यात नेहरूंचा दोष काय?
काँग्रेसकडे एकच प्रॉडक्ट आहे. तेच प्रॉडक्ट ते पुनः पुन्हा लाँच करतात व दरवेळी फेल होतात. मोदी म्हणतात ते एकवेळ खरे मानले तर ते काँग्रेस व गांधींना इतके का घाबरतात? भाजपमध्ये मोदीनाम व दंगलीशिवाय दुसरे एखादे प्रॉडक्ट असेल तर त्यांनी ते बाजारात आणावे. या प्रॉडक्टची ‘एक्सपायरी डेट’ 2024 पर्यंत आहे व त्यानंतर भारताचा राजकीय बाजार पूर्णपणे बदललेला असेल.