व्लादीमीर पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावं लागेल, पण…; सामनातून टीकास्त्र

| Updated on: Jun 26, 2023 | 8:35 AM

Saamana Editorial on PM Narendra Modi : व्लादीमीर पुतीन, पटनामधील विरोधकांची बैठक अन् वॅगनर ग्रुप; सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र

व्लादीमीर पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावं लागेल, पण...; सामनातून टीकास्त्र
Follow us on

मुंबई : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. यावेळी व्लादीमीर पुतीन याचा दाखला देण्यात आला आहे. तसंच वॅगनर ग्रुपचाही उल्लेख करण्यात आला आहे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल , पण लोकशाही मार्गाने, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणघात करण्यात आलाय. तसंच बिहारमधील पटनामध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीचाही उल्लेख आजच्या सामनात करण्यात आला आहे.

सामना अग्रलेख जशास तसा

पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅगनर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो . पुतीन असो की मोदी , त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो . हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘ वॅगनर ‘ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे . पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘ वॅगनर ग्रुप ‘ एकत्र आला . हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे . पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल , पण लोकशाही मार्गाने . पाटण्यातील ‘ वॅगनर ग्रुप ‘ ने तोच इशारा दिला!

पाटण्यात शुक्रवारी 17 प्रमुख राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक झाली. यात पाच विद्यमान मुख्यमंत्री तितकेच माजी मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकास एक लढत देऊन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले. लोकशाहीच्या दृष्टीने ही आनंदवार्ता आहे. या बैठकीवर गृहमंत्री अमित शहा यांनी अपेक्षित प्रतिक्रिया दिलीच आहे.

पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी-शहादेखील देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही आणू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या. आपल्या आजूबाजूला भाडोत्री लोक उभे केले. त्या भाडोत्र्यांना देशाची संपत्ती विकली. आज पुतीन यांच्या देशात काय घडत आहे? पुतीन यांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या ‘वॅगनर ग्रुप’ या खासगी लष्करानेच पुतीनविरुद्ध बंड पुकारले.

पुतीन यांची हुकूमशाही राजवट उलथवून रशियात सत्तापालट करण्यासाठी पुतीन यांचेच हे खासगी लष्कर रस्त्यावर उतरले होते. मॉस्कोचा ताबा घेण्यासाठी हे लष्कर पुढे सरकले होते. रशियाने म्हणजे पुतीन यांनी युव्रेनवर निर्घृण हल्ले केले. एक देश बेचिराख केला. विजयाचा मद तेव्हा पुतीन यांना चढला. जागतिक युद्धाच्या घोषणा केल्या, पण स्वतःच्या खुर्चीखालीच बॉम्बची वात पेटली आहे याची भनक पुतीनसारख्या हुकूमशहाला लागली नाही. ”पुतीन यांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल,” अशी शपथ वॅगनर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन यांनी आधी घेतली होती.

प्रिगोझिन यांनी जाहीर केले होते की, ”पुतीन देश संपवायला निघाले आहेत. पुतीन यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे रशियात अराजक माजले आहे. आमच्याकडे हजारो लोकांची फौज आहे. आम्ही पुतीन यांना हटवणारच!” पुतीन हे स्वतःस बलाढय़ मानत होते. देशातील सर्व यंत्रणांचे मालकच बनून ते राज्य करीत होते. विरोधकांचा त्यांनी थेट काटाच काढला. सरळ ठार केले किंवा तुरुंगात डांबले.

‘व्हाईट हाऊस’च्या पत्रकार परिषदेत देशातील लोकशाही, संविधान, अल्पसंख्याकांवरील हल्ले यावर विचारलेल्या एकाच प्रश्नाने मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली हे स्पष्ट दिसते. त्यामुळे वॉशिंग्टनचे त्यांचे फोटोसेशन काळवंडून गेले. त्यात पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅगनर ग्रुप’ एकत्र आला. हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल, पण लोकशाही मार्गाने. पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ने तोच इशारा दिला!