मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाणा देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांचा हा दौरा आता रद्द झाला आहे. यावर ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्या या दौऱ्यावर आक्षेप घेण्यात आला. खासदार संजय राऊत यांनीही यावर आक्षेप घेतला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातही यावरच भाष्य करण्यात आलं आहे. लोकशाहीचा मुडदा पाडून ते निघाले ‘घाना’ देशी!, या शीर्षका खाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. लोकशाहीवरचा हा आघात असल्याचंही सामना अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.
आपले स्पीकरसाहेब घानाच्या भूमीवर निघाले आहेत ते जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी. त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांचे स्वागत घानात होणार आहे काय? लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे.
लोकशाहीचा खून करून लोकशाही कल्याणाची प्रवचने झोडणे म्हणजे इदी अमिनने मानवतेवर चर्चा करण्यासारखेच आहे. स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) घानात निघाले होते. मात्र अखेर जनमताचा रेटा एवढा वाढला की, स्पीकर महाशयांनी हा दौरा रद्द केला, अशी बातमी हा मजकूर छापता छापता आली. निदान यापुढे तरी जनमताला गृहीत धरू नका.
विनोदाची निर्मिती कशी होईल ते सांगता येणार नाही, पण विनोद निर्मिती ही विसंगतीतून होते एवढे मात्र खरे. राज्यातील लोकशाही, संविधान, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा खुंटीला टांगून आपले स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) हे घाना नामक देशी लोकशाही, संसद या विषयांवरील आंतरराष्ट्रीय चर्चेत भाग घ्यायला निघाले आहेत. ही एक विसंगती आहे व विनोद तर आहेच आहे.
एक वर्षापासून येथे घटनाबाह्य सरकार अधिकारावर आहे. शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निवाडा दिला तरीही ‘स्पीकर’ वर्षभर सुनावणी घेत नाहीत व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दटावले तेव्हा ते लोकशाहीवर चर्चा करण्यासाठी घानाला निघाले आहेत. घाना देशात 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत ते उपस्थित राहणार आहेत. तेथे म्हणे जागतिक संसदीय लोकशाही, राजकीय प्रश्नांवर विचारमंथन होणार असून आपले स्पीकरसाहेब तेथे लोकशाहीवर चर्चा करतील.
इकडे आपल्या नजरेसमोर लोकशाही, संविधानाचा मुडदा पाडायचा आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर प्रवचने झोडायची. घाना हा पश्चिम आफ्रिका खंडातील एक देश आहे. अशा देशात आपले स्पीकरसाहेब निघाले आहेत. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या सुनावणीस आणखी विलंब होईल. किंबहुना, हा विलंब लागावा म्हणूनच स्पीकरसाहेबांना घाना येथे जाणाऱया शिष्टमंडळात समाविष्ट केले असावे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांना याच राष्ट्रकुल परिषदेसाठी घाना येथे जायचे होते. त्यांना तसे आमंत्रण होते, पण दिल्ली विधानसभा अध्यक्षांची घाना नायब राज्यपाल व वित्त विभागाने रोखून ठेवली. येथील स्पीकरसाहेबांची फाईल तत्काळ मंजूर झाली. आमदार अपात्रतेबाबत वेळ काढण्यास त्यांना ‘आंतरराष्ट्रीय’ कारण मिळावे म्हणून घाना देशी आपले स्पीकरसाहेब जातील व लोकशाहीवर प्रवचन झोडतील. हे विडंबनच म्हणावे लागेल.