नाशिक | 31 ऑगस्ट 2023 : देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होतेय. या बैठकीत देशभरातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. अशात राज्यातील पक्षांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षालाही निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा होती. तसंच संभाजीराजे या बैठकीला उपस्थित राहतील, अशीही चर्चा होती. त्यावर आता स्वत: संभाजीराजे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. स्वराज्य पक्षाचा इंडिया आघाडीशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण संभाजीराजे यांनी दिलं आहे.
स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीव्ही 9 मराठीला ‘स्वराज्य’ ची भूमिका सांगितली आहे. जयंत पाटील यांनी स्वराज्य पक्षाचे नाव घेतलं. मात्र आमच्याच अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. जयंत पाटील असं विधान करून दिशाभूल करत असल्याचा आरोप करण गायकर यांनी केला आहे.
स्वराज्य पक्षाचा इंडिया आघाडी किंवा महायुतीशी कोणताही संबंध नाही. आज इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होतेय. मात्र बैठकीचं स्वराज्य पक्षाला कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण करण गायकर यांनी दिलं आहे.
आज अवघ्या देशाचं लक्ष मुंबईकडे लागलं आहे. कारण देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला आज संध्याकाळी सुरूवात होईल. देशभरातील प्रमुख नेते या बैठकीला हजर असतील. या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
तर दुसरीकडे ‘स्वराज्य’ च्या गोटातून दुसरी बातमी समोर येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात आता छत्रपती संभाजीराजे मेळावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे येवला दौरा करणार आहेत. येत्या 10 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे येवल्यात मेळावा घेणार आहेत. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य’ अंतर्गत शाखा उद्घाटन आणि मेळाव्याचे आयोजन नाशकात करण्यात आलं आहे.
इंडियाच्या या बैठकीत आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार आहे.थोड्याच वेळात राहुल गांधी यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. तसंच विरोधकांच्या आघाडीचा प्रमुख चेहरा ठरवला जाण्याची शक्यता आहे. यात मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचं नाव आघाडीवर आहे.