मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बोलताना सामना विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं. त्याला आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. भाजपने सामनाविरोधात कोर्टात जावं, मी वाट पाहातोय. त्यांच्याकडे वकील नसेल तर मी चांगला वकील देतो. त्यांनी कोर्टात जावं, असं संजय राऊत म्हणालेत.
चंद्रशेखर बावनकुळे कधी कोर्टात जातायेत याची मी वाट बघतोय. त्यांनी कोर्टात जायला पाहिजे. त्यांच्याकडे वकील नसेल तर मी चांगला वकील देतो. त्यांनी कोर्टात जावं. चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या नेत्यांनी सामनाचा अग्रलेख काळजीपूर्वक वाचायला हवा. वाचाल तर वाचाल… सध्या भाजपचा सगळा वेळ कटसारस्थानं, बदला यातच जात आहे. त्यामुळे त्यांचं वाचन कमी झालं आहे. त्यांनी अग्रलेख व्यवस्थित वाचावा मग बोलावं, असं संजय राऊत म्हणालेत.
सामनाच्या अग्रलेखात जर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हटलं तर त्यात गैर काय? मिरच्या का झोंबल्या? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे जापानला गेले तसे त्यांनी चीन ला जावं. लडाखला जावं. तिथली परिस्थिती समजून घ्यावी, हे फडणवीस यांचं डिमोशन आहे. अजित पवार हे परखड मत मांडणारे नेते आहेत. त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. कळव्यातील घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे अजित पवारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.
चीन लडाखमध्ये घुसला, किती गावं, किती जमिनींवर कब्जा केला, हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. अरुणाचलच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारानेही सांगितलंय की चीनने कब्जा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रावर चांद्रयान 3 पाठवलंय. त्यातूनही पाहा की चीनने कीती कब्जा केलाय ते. आता लडाखची गोष्ट आहे, चीनने लडाखवरही ताबा मिळवला आहे, त्याचे पुरावेही समोर आले आहेत, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
राहुल गांधी यांना पाहा. ते लडाखमध्ये आहेत. आम्हीही काही महिन्यांपुर्वी लडाखला गेलो होतो. मी पाहिलं ते लडाखमध्ये आहे. राहुल गांधींनी लेह ते लडाखपर्यंत बाईक चालवल्याचेही मी पाहिले आहे, असं म्हणत राहुल गांधी यांच्या बाईक रायडिंगवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.