बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरूनच आले होते; संजय राऊत यांचे गंभीर आरोप

| Updated on: Jun 27, 2023 | 1:04 PM

Sanjay Raut on CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवणारे नकली, हा तर निर्लज्जपणाचा कळस; संजय राऊत आक्रमक

बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश वर्षावरूनच आले होते; संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या आदेशानंतर बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला हातोडे मारणारे निर्लज्ज आणि नीच आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर बाळासाहेबांसाठी अनेक खटले अंगावर घेऊ, असं म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जात आहेत. कुणाच्या फोटोला हातोडे मारतोय हेदेखीलया दिवट्यांना कळत नाही. हे कसले शिवसैनिक?, असा सवाल राऊतांनी विचारला आहे. यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. त्यांना तो अधिकार नाही. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवणारे हे लोक नकली आणि ड्युप्लिकेटच आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

ज्या बाळासाहेबांच्या नावावर आपण जगलात, वाढलात, मोठे झालात. त्यांच्याच नावावर राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवलं. त्यांच्या फोटोवर हातोडा चालवण्याचे आदेश देता? तुम्हाला काहीही वाटत नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्याला मनसेनं सवाल विचारला आहे. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी संजय राऊतांना प्रतिप्रश्न केला आहे. “बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारला त्याच्या कानशिलात लगावली एकदम मान्य पण बाळासाहेबांना “म्हातारा “असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या ????”, असा प्रश्न संदिप देशपांडे यांनी विचारला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतलं. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. केसीआर मोठा ताफा घेऊन आले. जेवणावळी झाल्या. पंढरपुरात दर्शन झालं. हे शक्ती प्रदर्शन तुम्ही कुणाला दाखवत आहात?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

तुमचा पक्ष तेलंगणामधला आहे. आपण महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटला आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

600 गाड्या घेऊन येणं हे सत्तेचं, पैशाचं संपत्तीचं भोंगळवाणं दर्शन आहे. जे एकनाथ शिंदे करतात. आता स्पष्ट झालं आहे की केसीआर ही भाजपची बी टीम आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.