मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : जिथे बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचा अंगार फुलवला होता. तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावावरून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली होती. याला आता खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. अंगार कोण भंगार कोण हे येणारा काळ ठरवेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला भंगार म्हणण्याइतकं जीभ खाली गेली आहे. एकनाथ शिंदे यांना जे पी नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर लावण्याची वेळ आली आहे. हिंमत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वेगळा पक्ष काढावा. पक्ष स्थापन करून लोकांपुढे जा. मग समजेल अंगार कोण आहे आणि कोण भंगार आहे, असं ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी दिलं आहे.
शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसेनेचा विचारांचा अंगारच असतो. बाळासाहेब ठाकरे असताना ते मेळावा घेत होते. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा दसरा मेळावा हा देशामध्ये महत्व प्राप्त केलं आहे. त्यामुळे अंगार कोण भंगार कोण हा येणारा काळ ठरवेल. तुमचे विचार ऐकण्यासाठी येत असतील तर येऊ द्या तुमच्या विचारांना आम्ही अंगार भंगार म्हणणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेला भंगार म्हणण्या इतकी आपली जीभ खाली घसरली आहे. आपण सध्या नड्डा मोदी आणि अमित शाह यांच्या विचारांवर चालले आहेत. हा काय बाळासाहेबांच्या विचारांचा अंगार नाही. बाळासाहेबांचा विचार हा स्वतंत्र होता. त्यांनी भाजप पक्षासोबत पंचवीस वर्षे युती ठेवली. पण ती युती करत असताना त्यांनी शिवसेनेचा विचार कुठलाही दुसरा पक्षामध्ये विचारला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे पी नड्डा यांच्या स्वागतासाठी बोर्ड लावलेत. मी तुमच्यावर ही वेळ आली आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
एकनाथ शिंदे व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जातात. हाच अंगार आणि भंगारमधला फरक आहे. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं जावं लागतं. इथे व्हायब्रंट महाराष्ट्राचा आत्मा काढून गुजरातला पाठवला जातोय. जो महाराष्ट्र या देशात उद्योगक्षेत्रात सर्वाधिक व्हायब्रंट होता. त्या महाराष्ट्राला संपवून, मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जातात. हाच का तुमचा अंगार? याच्यावर शिंदेंनी उत्तर द्यावं, असं राऊत म्हणालेत.