मुंबई | 07 सप्टेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर घणाघात केलाय. मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी आपला प्राणपणाला लावला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कधीकाळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात आंदोलन केलं होतं. तेव्हाही हेच गिरीश महाजन मध्यस्थी करायला मध्ये होते. पण त्यातून काहीही निश्पन्न झालं नाही. आजही भ्रष्टाचार आहे. ते फक्त अण्णांना गुंडाळून आले. पण मनोज जरांगे गुंडाळलं जाणारं व्यक्तिमत्व नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
मनोज जरांगे पाटील हा फकीर माणूस आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. या अत्यंत साध्या माणसाने शिंदे सरकारला जेरीस आणलं आहे. ते झुकणार नाहीत. त्यामुळे ही गंडवागंडवी इथे करू नका. हे आंदोलन गुंडाळलं जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. आज आपल्या सहकाऱ्यांशी बोलून थोड्याच वेळात 11 वाजता जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अफगाणिस्तान, पाकिस्तान इराण हे देश भारतात आणणार असाल तर आम्ही त्याचं स्वागत करू. अखंड भारत म्हणजे जमीनीचा एक तुकडा नाहीये. अखंड भारत म्हणजे या देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचं हित आणि एकतेचा विचार हे आहे. जमीनीने देश बनत नाही. तर लोकांनी देश बनतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत जर अखंड भारतावर बोलत असतील तर त्यांनी ते जरूर करावं. फक्त बोलू नता तर इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांनीही आपल्यासोबत आणा, असं संजय राऊत म्हणालेत.
तामीळनाडूच्या एका मंत्र्याने सनातन धर्माविषयी जे मत व्यक्त केलंय. त्याच्याशी कुणीही सहमत नाही. ही जर त्यांची वैयक्तिक मतं असतील तर त्यांनी ती त्यांच्या पुरती ठेवावीत. याबाबत सामनाच्या अग्रलेखातून आमची भूनिका स्पष्ट केली आहे. त्या पलिकडे त्यावर मी बोलू इच्छित नाही, असं संजय राऊत म्हणालेत.