मुंबई | 04 सप्टेंबर 2023 : जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सध्या तीन-तीन जनरल डायर आहेत, असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात जनरल डायर कोण? हे महाराष्ट्रात सर्वांना समजलं आहे . महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे. एक नाहीतर तीन-तीन जनरल डायर सध्या राज्यात आहेत. एक मुख्य जनरल डायर आणि दोन उप जनरल डायर. जनरल डायरच्या मानसिकतेने राज्यकारभार सुरु आहे. जे विरोधात जातील. त्यांच्यावरती हल्ले करा. त्यांना गोळ्या मारा असा कारभार सध्या सुरू आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
तुम्ही संसदेत विशेष विधेयक आणता. दिल्ली सेवा बील पास करून घेता. आताही ऐन गणपतीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मग घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्नही सोडवता येऊ शकतो. मराठा आरक्षणासह अन्य आर्थिकदृष्या दुर्बल घटकांना आरक्षण देता येईल. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी घटना दुरूस्ती करता. मग महाराष्ट्रात एक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो. उपोषण करतो. त्यावर तुम्ही गोळ्या झाडता. महिलांची डोकी फोडता. मग घटना दुरुस्ती करून त्यांना न्याक का देत नाही? हा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
जालन्यात मराठी बांधवांवर लाठीचार्ज झाला. लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना का घडली? तिथं लोकांवर हल्ला करण्याचे आदेश कुणा दिले? तो फोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून होता की गृहमंत्र्यांचा होता? या लाठीहल्ल्यात पोलिसांचा दोष नाहीये. आता या प्रकरणात पोलिसांचा बळी दिला जातोय. मात्र हे आदेश वरून आले होते. हे वरिष्ठांचे आदेश होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. शासन आपल्यादारी या कार्यक्रमात कुठल्या अडथळा येऊ नये, या जाब विचारू नये. यासाठी हे आंदोलन चिरडून टाका, असे आदेश वरून आले आणि पोलिसांनी त्यांचं पालन केलं, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.