गोविंद ठाकूर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. 2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत. मी सांगतोय तुम्हाला आणि मी सांगतो ते घडतं, असं संजय राऊत म्हणालेत. जे जे महाराष्ट्राच्या वाटेत आडवे आले आहेत ते याच मातीत गाढले गेले आहेत. तसंच दोन गुजराती देखील नक्कीच गाढले जातील, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा या आपल्या घरापर्यंत आली असती. मगाशी आपण म्हणाला चार गुजराती आहेत. आपलं गुजराती माणसाचे भांडण नाही. आपलं गुजरातचं भांडण नाही. पण आमच्या वाट्याचे उद्योग तिकडं नेण्याला आमचा विरोध आहे. तुमची जर अपेक्षा असेल की मी भाषण करायला आलो अजिबात नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
शिवसेना सोडून गेलेल्यांना गाडून छातीवर शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. त्याचे काही अंश दिसतात. पण औरंगजेब गेला तसा तुम्हीही जाणार आहात, असं म्हणत संजय राऊत यानी मोदी शाहांना ललकारलं आहे.
शिंदे गटाला जनता माफ करणार नाही. गद्दारीला थारा नाही. या 40 आमदारांना जनता धडा शिकवेन. त्यांना घरात बसवेल. कायदाचा लढा त्यांच्या विरोधात आहे. महाराष्ट्र तोडण्याचं आणि महाराष्ट्राला कमजोर करण्याचं काम सध्या केलं जात आहे. ते बाळासाहेब असते तर असं करण्याची कुणात नसती. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो लढा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.
2024 पूर्वी नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा. कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत, आणि मी सांगतो ते घडतं. 4 काय 400 गुजराती येऊ द्या, एक शिवसैनिक त्यांच्यावर भारी पडेल. ही शिवसेना या महाराष्ट्राची… मुंबईची रक्षक आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही यांचा डाव हाणून पाडू, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.