मुंबई | 20 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांआधी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले. काळाराम मंदिरात गेले. पूजा केली. रॅली केली. राजकीय आरती केली. पण त्यांना भगरच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावं वाटलं नाही. त्यांना सावरकरांची आठवण झाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही. पण आमचे नेते उद्धव ठाकरे तसं तसं करणार नाहीत. ते तिथं जातील, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये सुरु होत आहे. प्रत्यक्षात 23 तारखेला अधिवेशन असेल. 22 तारखेला काळाराम मंदिरात दर्शन पूजा आणि रामकुंडावर पूजा असा कार्यक्रम असेल. साधारण 5. 30 वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. पावणेसात वाजता उद्धव ठाकरे गोदातीरावर जातील आणि आरती होईल. याआधी अनेकदा आम्ही शरयू तीरावर आरती केलीय. पण यावेळी नाशिकमध्ये करू. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन करतील, असं संजय राऊतांनी सांगितलं.
आमच्यासाठी 22 जानेवारी दिवस अत्यंत महत्वाचा आहे. नाशिकमध्ये येऊन सावरकरांना अभिवादन केलं नाही असं होऊ शकत नाही. 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रसी क्लबमध्ये शिवसेनेची राज्यव्यापी शिबिर पार पडेल. प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होईल आणि काही ठराव मांडले जातील. 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे म्हणून हे औचित्य साधलंय. अयोध्येनंतर रामायणात पंचवटीला महत्व आहे. म्हणून आम्ही नाशिक निवडलंय, असं संजय राऊत म्हणालेत.
हुतात्मा अनंत कान्ह्वरे मैदानात म्हणजेच गोल्फ मैदानात शिवसेनेचं विराट अधिवेशन सभा पार पडेल. जनता न्यायालय हा महाराष्ट्रातला आणि देशातला यशस्वी कार्यक्रम झाला. जनता न्यायालयात या देशातली न्यायव्यवस्था, केंद्रीय यंत्रणा याना एक्सपोज केलं. तिकडे हेमंत सोरेन असतील किंवा केजरीवाल असतील त्यांनाही इंडिया आघाडीतुन बाहेर पडा यासाठी दबाव टाकण्यात येतोय. मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात. तर त्यांना अक्कल नाही का? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं होते हे त्यांना कळत नाही का? मुख्यमंत्री तुकड्यावर जगतायत, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.