मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे शिवसेनेच्या मूळ विचाराला धक्का पोहोचला, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी केला. त्याचमुळे आम्ही शिवसेनेचा नैसर्गिक मित्रपक्ष असणाऱ्या भाजपसोबत आलो, असं शिवसेना शिंदे गट म्हणताना दिसला. पण आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सरकारने सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे.
महाविकास आघाडीने शिंदेगटाविरोधात वारंवार घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओके, असं म्हणत महाविकास आघाडीने शिंदेगटावर घणाघात केला. त्याला आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनीही काय 50 खोके घेतले का?, असा प्रतिप्रश्न संजय शिरसाट म्हणालेत. आमच्यावर आरोप करणं हे करमणुकीचं साधन होतं.आता राष्ट्रवादीवर काय 50 खोके घेतले शंभर खोके घेतले असा आरोप करणार का?, असंही ते म्हणालेत.
काळा दगडावरची पांढरी रेष आहे. मी सत्य वचन बोलतोय. भविष्यामध्ये काँग्रेस फुटेल. ती कधी फुटेल माहीत नाही पण भविष्यामध्ये काँग्रेस फुटणार हे मी गॅरंटी देऊन सांगतोय. कॅबिनेट विस्तारापूर्वी काँग्रेस फुटणार आहे की नंतर फुटणार हे पाहावं लागेल, असा दावा संजय शिरसाट म्हणाले आहेत.
अजित पवार आता भाजपसोबत आले आहेत. तर आता शिंदेंनी राजीनामा द्यावा, असं संजय राऊत म्हणाले. त्याला आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी नेमकी टीका केली की, युतीत जे बदल झाले म्हणून आम्ही नाराज आहोत. त्या संजय राऊतला तुम्ही सांगा की बाबा घर सांभाळ. बाशिंग बांधली की घोड्यावर बसलो. या चर्चा करण्यापेक्षा तुमच्या घरात काय सुरू आहे त्यावर लक्ष द्या, असं संजय शिरसाट म्हणालेत.
एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावं लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं त्याला शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वादाचा कुठलाही विषय नाही, असंही शिरसाट म्हणालेत.
शिवसेनेतील आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्याला शिरसाट यांनी नाकारलं आहे. विनायक राऊत यांना एवढंच विचारा की त्यांना कोणत्या आमदाराचा फोन केला? त्या आमदारांची नावं सांगा, असं प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी आल्याने आमची कुठलीही अडचण होत नाहीये. कारण कुटुंबप्रमुख हे एकनाथ शिंदे आहेत, असंही शिरसाट यांनी सांगितलं आहे.