मुंबई | 29 जुलै 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवार यांचाच हात असल्याची चर्चा राज्यासह देशभर रंगली. मात्र शरद पवार यांनी आपण भाजपच्या विरोधात लढा देणार असल्याचं म्हटलं. शिवाय अजित पवार यांच्या कृतीला आपलं समर्थन नाही, असं जाहीर केलं. दोन्ही गटांनी पाच जुलैला बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत आरोप प्रत्यारोप झाले. मात्र त्यानंतर या घडामोडींवर शरद पवार यांनी आपली उघड भूमिका मांडली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या ‘मौनाचे’ अनेक अर्थ काढले जाऊ लागले. त्यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं. मात्र आता शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार यांनी ठामपणे आपली भूमिका बोलून दाखवली आहे. आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांची साथ सोडायची नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. देशातील विरोधकांची आघाडी ‘INDIA’ च्या बैठकीचं चांगलं नियोजन करा, अशा सूचनाही शरद पवार यांनी दिल्या आहेत.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
शरद पवार यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही अर्थ दडलेला असतो, असं राजकीय जाणकार सांगतात. त्याच नुसार मागच्या काही दिवसात शरद पवार यांनी कोणतीही पत्रकार परिषद न घेणं, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार गटावर थेट टीका न करणं, पक्ष कुणाचा याबाबत कायदेशीर हालचाली न होणं, या मागे शरद पवार यांची रणनिती दडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचंय, या शरद पवारांच्या कालच्या विधानाने या सर्व चर्चांना शरद पवार उधळून लावणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
मविआच्या सभेसंदर्भात घडामोडी घडताना दिसत आहेत. काँग्रेस राहुल गांधी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांची महाराष्ट्रात एकत्रित सभा होणार आहे. काल झालेल्या या बैठकीत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. ज्याचे आमदार जास्त त्याचा विरोधी पक्षनेता आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. मात्र मविआच्या सभा पुन्हा सुरू होणार आहेत. 16 ऑगस्टनंतर मविआच्या सभेसाठी राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत.