“राष्ट्रवादीने सत्ता आणि प्रशासनाचा उपयोग पक्षवाढीसाठी केला, उद्धव ठाकरेंना हे समजलं नाही”

| Updated on: Jul 04, 2023 | 12:34 PM

Maharashtra Politics : राष्ट्रवादीवर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंवर निशाणा अन् मविआ सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; शिवसेनेच्या आमदाराच्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादीने सत्ता आणि प्रशासनाचा उपयोग पक्षवाढीसाठी केला, उद्धव ठाकरेंना हे समजलं नाही
Image Credit source: IANS
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. 2019 ला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. शपथविधी झाला पण आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने फडणवीस-पवार सरकार कोसळलं. नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. पुढे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारलं. बंड केलं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. आता अजित पवार यांनी पुन्हा आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आणि शिवसेना-भाजपच्या युतीत सामील झाले.

राज्यात या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ट्विटमध्ये राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. तर मविआ सरकारच्या कामकाजावरही टीकास्त्र डागण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे.

आमदार योगेश कदम यांचं ट्विट जसंच्या तसं

जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते तेव्हा जे काम एका पक्षनेतृत्वाने करणे अपेक्षित होते ते काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या आमदारांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठी करत होते. पक्षाच्या आमदारास निधी वाटप करणे, स्थानिक नेतृत्वास ताकद देणे असे काम राष्ट्रवादी काँगेसमार्फत झाले. मात्र, याबाबतीत *तत्कालीन* शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि पक्षनेतृत्व सपशेल अपयशी ठरले. विशेष म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही घटक पक्ष प्रशासनाचा आणि आपल्या सत्तेचा उपयोग पक्षवाढीसाठी करतोय, हे त्यावेळेच्या आमच्या दुधखुळ्या पक्षनेतृत्वास समजले नाही.

आमचे म्हणणे केवळ एवढेच होते की राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेतृत्व जे काम करीत आहे ते आमचे पक्षनेतृत्व का करत नाही. हा त्यांचा नाकर्तेपणा होता, त्यांना प्रशासनाचा अभ्यास नव्हता. यांच्या नाकाखालून मोठमोठे निधी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारसंघात जात होते. परंतु आमच्या पक्षनेतृत्वास दिड ते दोन वर्ष मंत्रालयात येण्यासाठीच लागली ही खरं तर आमची त्यावेळची मोठी शोकांतिका होती. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व हे मंत्रालयात सदैव टिकून होते. अर्थातच, अशा वेळेस घटक पक्ष इतक्या सक्रियतेने काम करत असताना दुसरा घटक पक्ष कमकुवत होणं साहजिक आहे.

परंतु मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब हे प्रशासनाचा अनुभव असलेले सतर्क नेतृत्व असल्यामुळे ते आज मुख्यमंत्री म्हणून राज्याचा योग्यरीत्या कारभार सांभाळत आहेत. त्यांनी आजपर्यंत घटक पक्षासह सहकारी आमदारांना, कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी सत्तेचा योग्य वापर करून सर्वगुणसंपन्न नेतृत्वाचे उदाहरण प्रस्थापित केले आहे. याच कारणामुळे त्यांच्यासोबत शिवसेना पक्षाचे सर्व आमदार, कार्यकर्ते विश्वासाने पुढे जात आहेत.