गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हिंगोलीमध्ये काल ओबीसी एल्गार महासभा झाली. या सभेत मराठा आरक्षणासाठी स्थापित करण्यात आलेली शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केलं आहे.
शिंदे समिती आणि भुजबळांची मागणी याबाबत सरकारला बोलून द्या. राजकीय पक्ष ज्या भूमिका घेतात. त्याला अर्थ नाही. सरकराने यावर बोलावं. महाराष्ट्रातील वातावरण इतकं खराब झालं आहे की प्रश्न पडतो, राजकारणासाठी महाराष्ट्र आपण स्थापन केला आहे का? आमच्यातील आरक्षण घेतलं तर तुमच्या तंगड्या तोडू. हात-पाय तोडून हातात देऊ. अशा प्रकारचं विष या राज्यामध्ये कुणीही कालवलं नाही. आता ते सुरु आहे. सर्वांनी एकत्र बसले पाहिजे पाहिजे. छगन भुजबळ आणि जरंगे पाटील यांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही आवाहनं कसली देत आहात? तुम्ही स्वत: सरकारमध्ये आहात. तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारची भाषा वापरली जात आहे. तशी भारत-पाकिस्तान फाळणी झाली. तेव्हा अशा प्रकारची भाषा वापरली गेली होती. या राज्यात आरक्षणावर जातीमध्ये भांडण सुरू आहेत. यामध्ये एकमेकांचे रक्त सांडू, एकमेकांचे प्राण घेऊन हात पाय तोडून हातात देऊ. अशा प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये वापरली गेली नव्हती, असंही राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज मथुरा दौऱ्यावर आहेत. त्यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. भाजपच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात तुम्ही राजकारण पाहत आहात का? मग मोदी देखील गेले होते मथुरा या ठिकाणी मोदी श्रद्धेने गेले असतील तर आदित्य ठाकरे देखील श्रद्धेने जात आहेत. हा धार्मिक कार्यक्रम आहे. म्हणून आदित्य ठाकरे यांना तिथे आमंत्रित केलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.