गणेश थोरात, प्रतिनिधी, मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक मोठे गौप्यस्फोट केलेत. यात त्यांनी शरद पवार यांनी भाजपसोबत बोलणी केली. मात्र ऐनवेळी माघार घेतल्याचं म्हटलं. त्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीकडूनही उत्तर देण्यात आलं. सुप्रिया सुळे यांनी हे सगळे दावे फेटाळले आहेत. या सगळ्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर घणाघात केलाय. यांच्यावरती काय विश्वास ठेवता? ईडी आणि सीबीआयला घाबरून भाजपसोबज जाणारी ही मंडळी. यांच्या बोलण्यात काय तथ्य असणार?, असं संजय राऊत म्हणाले.
डरपोक नंबर एक या चित्रपटातील हे सगळे विलन आहेत. भविष्यात यांच्यावर कोणीतरी चित्रपट काढला पाहिजे. या लोकांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी खंजीर खुपसला आहे. मला पडद्यामागे काय घडतंय हे सर्व समोर आलं पाहिजे. लोक यांच्यासोबत केव्हाही जाणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.
आरेसंदर्भात उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे योग्य होती. जे आरे-आरे करत होते. आज शेवटी तुमचंच सरकार आहे. तुम्हीही त्याच जागेवर कारशेड उभं करत आहात. लोकांना कितीही त्रास झाला. किती खर्च झाला. तरी पण विरोधासाठी विरोधात हे भाजपचं धोरण आहे.देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर अडचणी उभ्या केल्या. शेकडो आरेची झाडं तोडून पर्यावरणाचा नाश केला. शेवटी आलात कुठे? हे यांचं राजकारण आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मणिपूरला काय चाललं आहे? गृहमंत्री सांगत आहेत रक्ताचा एक थेंब न सांडता आम्ही राममंदिर बांधलं. देशाच्या गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती आहे. मणिपूरमध्ये आज रक्तपात सुरू आहे. तो रक्तपात गृहमंत्री रोखू शकले नाहीत. आता प्रश्न राहिला राम मंदिराचा… तर त्यांचा हे वक्तव्य म्हणजे शेकडो करसेवकांनी मृत्यूला कोटायला हा त्यांचा अपमान आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरयू नदी कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली होती. आम्ही तिथे उपस्थित होतो. सगळे आणि तुम्ही म्हणता रक्ताचा एक थेंब न काढता राम मंदिर मिळालं. तर तेव्हा तुम्ही नसाल तिकडे. सगळे तिकडे प्रमुख हिंदुत्ववादी लोक होते. गोधरा हत्याकांड काय होतं ते देखील बलिदान होतंच ना. तेही तुम्ही विसरलात? सत्तेवर आल्यावर अमित शाहांचं हे विधान आहे. ते शेकडो कारसेवकांच्या बलिदानाचा अपमान करणारं आहे. आज हे मंदिर उभा राहत आहे. त्यांचं श्रेय सर्वोच्च आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.