मुंबई : तारीख होती 20 जून. दिवस होता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा… सगळेच पक्ष आपआपल्या उमेदवारांच्या विजयात दंग होते. याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित अशी घटना घडत होती. शिवसेना पक्षातील आमदारांनी बंड केलं होतं. आतापर्यंत महाविकास आघाडीचा भाग असणारे, ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणारे स्वपक्षाचे नेते, आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभे राहिले होते.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सूरत गाठली. मग गुवाहाटी, गोवा अन् मग मुंबईमार्गे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं.
या सगळ्या बंडखोरीला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे ठाकरे गटाकडून या दिवस खोके दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ’50 खोके, एकदम ओके’ ही घोषणा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे. त्यामुळे याचाच धागा धरत ठाकरे गटाकडून खोके दिन साजरा केला जाणार आहे.
राष्ट्रवादीनेही हा दिवस साजरा करायचा ठरवलं आहे. राष्ट्रवादी गद्दार दिन म्हणून हा दिवस साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप महाविकास आघाडीकडून आणि विशेषत: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो. त्याचा आधार घेत राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करणार आहे.
पुण्यात यासंदर्भात आंदोलन केलं जात आहे. गद्दार दिवस म्हणून राष्ट्रवादीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. खोके ठेवत राष्ट्रवादीकडून शिंदे गटाचा निषेध करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन होत आहे.
शिवसेना खोके दिन तर राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा केला जात आहे. अशातच याला शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे. शिवसेना स्वाभिमान दिन म्हणून आजचा दिवस साजरा करणार आहे आणि महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देणार आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 20 जूनला ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. हे पत्र संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. लोक आग्रहास्तव!, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
PUBLIC DEMAND!@UN@antonioguterres@UNinIndia @PMOIndia @UNICEFIndia @BJP4India @AUThackeray @unfoundation @UNHumanRights pic.twitter.com/OJ5qu28oY2
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 20, 2023