मुंबई : अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटरला जात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज्यात सध्या भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे या भेटीवर युतीतील सहकाऱ्यांची प्रतिक्रियाही महत्वाची आहे. शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादा पवार सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास अजितदादांना चांगला वाटतोयय शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे गतिमान काम करत आहेत. त्यांच्यासोबत अजितदादा आलेले आहेत, असं ते म्हणाले
अजित पवारांनी शरद पवारसाहेबांची भेट का घेतली हे त्यांनाच विचारावं लागेल. त्यांनाच ते येत्या काळात जाहीर करावं लागेल. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असू शकतो. पण शिंदेसाहेब, फडणवीसजी आणि अजितदादा हे तिघे सध्या एकत्र आलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार वेगाने काम करेन यात शंका नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचं सरकार सध्या सत्तेत आहे. अशात अजित पवार यांनी अचानकपणे शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोजक्याच शब्दात ही प्रतिक्रिया दिली आहे. मला याची काही कल्पना नाहीये. पण जर त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली असेल. त्यात वेगळं काही नाही. कारण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
दोन जुलैला अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. मात्र त्यानंतर आज सर्व मंत्र्यांसह अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.