मुंबई : अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदावर टांगती तलवार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शिवाय ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी तर उघडपणे एकनाथ शिंदे यांना पदावर राहणार नाहीत, असं म्हटलं. त्याला आता मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचं वृत्त साफ चुकीचं आहे. आमदारांमध्ये बाचाबाची झाली हे वृत्तही साफ चुकीचं आहे. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे नागपूरवरून मुख्यमंत्री आले ही बातमीही चुकीची आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
टीव्ही 9 मराठीशी बोलताना उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही राजीनामे देणारे नाही तर राजीनामे घेणारे आहोत. हे आम्ही काही दिवसांआधी दाखवून दिलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर भाष्य केलं.
गद्दार आणि खोके या शब्दातून आमची मुक्ती झालीये. अजितदादांच्या उठावानंतर आमची या सगळ्या आरोपांतून सुटका झालीये, असं म्हणत उदय सामंत यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
राष्ट्र्वादी पक्षात जी घडामोड झाली यावर बोलणार नाही. पण शिवसेनेचे आमदार खासदार बैठकीत उपस्थित होते, विधान सभेच्या आमदारांनी कामकाज कसं करावं काय योगदान द्यावं यावर सविस्तर चर्चा झाली, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
11 महिन्यांपूर्वी आम्ही मंत्री झालो. ज्या पक्षातून उठाव केला तिथे कुणी जाणार नाही. तिथून कुणी येणार नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांची बदनामी करणं, वैयक्तिक टीका आणि सरकार पडायची तारीख द्यायची, हा ठाकरे गटाचा अजेंडा आहे. पण त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असं म्हणत उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
काही मंडळी खोके गद्दार करत होते त्याला पूर्णविराम मिळाला. काल दादांनी भाषणात एकनाथ शिंदे आणि फडणवीस कसं काम करतायेत. याचा उल्लेख केला. त्यांच्या पक्षात काय चाललं आहे यावर मला बोलायचा अधिकार नाही. शिंदेंच्या नेतृत्वाखाली सगळे आमदार खासदार एकत्र आहोत. आता युतीचं सरकार इथून पुढेही जनतेच्या हितासाठी काम करत राहील, असं सामंत यांनी सांगितलं.
येत्या अधिवेशनात कसं कामकाज करावं. मंत्र्यांनी जनतेला कसा वेळ द्यावा, संघटनात्मक बांधणी करावी, आमदार वाढले पाहिजेत अशी चर्चा झाली. मात्र जे घडलं नाही ते आपल्यापर्यंत पोहोचवून संभ्रम निर्माण केला जातोय. जनतेत हा संभ्रम राहू नये यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहोत, असं उदय सामंतांनी यावेळी सांगितलं.