मुंबई : ठाकरे गटाचे नेते, आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार भाजपमध्ये जातील, असा दावाही त्यांनी केला आहे. “शिंदे गटात आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, शिंदे गटातील सर्व खासदारांना तिकीट मिळणार नाही. हे खासदार भाजपमध्ये जातील. काही खासदारांची तिकीट नाव बदलून भाजप शिवसेनेकडे तिकीट मागेल आणि निश्चितपणे जे शिंदे सोबत बारा खासदार गेलेत ते सगळे तिकीट मिळण्यापासून वंचित राहतील”, असं वैभव नाईक म्हणालेत.
केंद्र सरकारकडून महिलांवरती अन्याय अत्याचार थांबतील, असं कुठलंही विधान करण्यात येत नाहीये. दिल्लीतील कुस्तीपटू बघा महिनाभरापासून उपोषण करत आहेत. त्यांना न्याय मिळत नाही. संजय शिरसाट यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार नाही. हे आधीपासूनच ठाऊक होतं. म्हणूनच आम्ही आवाज उठवत होतो. सुषमा अंधारे ज्या पद्धतीने काम करतात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे अशी विधानं केली जात आहेत, असंही वैभव नाईक म्हणालेत.
कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याआधी सुद्धा काही आमदार घेऊन नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. पण त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यांच्यासोबत जे आमदार गेले ते इतिहासात जमा झाले. येणाऱ्या निवडणुकीत शिंदेंचे आमदार गेले ते देखील इतिहास जमा होतील, असं वैभव नाईक म्हणालेत.
जी कोकणामध्ये विकास काम मंजूर केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली गेली पाहिजे. लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत. भुमरेंना त्यांच्या मतदारसंघातले किती आमदार विचारतात? हे त्यांनी सांगावं आणि संजय राऊतांवर टीका करण्यापेक्षा तुमचा येणारा काळ कसा असेल हे तुम्हाला जनताच येत्या काळात दाखवेल, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं शिवसेनेचे नेते म्हणत आहेत. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहेत. त्यावर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात अजिबात नाहीत.उलट त्यांच्याकडचेच आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. पुढे-पुढे पहा काय होईल ते, असं म्हणत नाईक यांनी या चर्चांना उत्तर दिलं आहे.