Big News : ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर; शाखा अनधिकृत असल्याचा BMC चा दावा

| Updated on: Jun 22, 2023 | 1:20 PM

Shivsena Uddhav Thackeray office Destroy By Mumbai Mahapalika : मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेचा हातोडा

Big News : ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर; शाखा अनधिकृत असल्याचा BMC चा दावा
Follow us on

मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या कारवाईवेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची कारवाई सुरू होताच शिवसैनिकही तिथे जमले आहेत.

वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचं हे कार्यालय आहे. फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. या कार्यालयावर आता कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय आता तोडण्यात येत आहे.

शाखा 40 वर्षे जुनी; ठाकरेगटाचा दावा

ज्या शाखेवर महापालिका कारवाई करत आहे. ती शाखा 40 वर्षे जुनी आहे. 1995 च्या झोपड्यादेखील आपण अधिकृत केल्या आहेत. मग 40 वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असं महापालिका कसं म्हणू शकते?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे. गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेनं कारवाई करत आहेत. हे योग्य नाही, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत.

वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत. 10 कोटींची ऑफर नाकारल्यामुळे ही कारवाई झाल्याचं हाजी हलीम खान यांनी म्हटलं आहे.

या कारवाई आधी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. मला शिवसेनेनं ऑफर दिली ती मी नाकारली, म्हणून महापालिकेने ही कारवाई करण्यात आली. पण मी उद्धव ठाकरेंना कधीही सोडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत राहिल, असं हाजी हलीम खान यांनी म्हटलं आहे.

सत्ताधारी विनाकारण ठाकरे गटाला त्रास देण्यासाठी ही कारवाई करत आहेत. आमची शाखा अधिकृतच आहे. मागच्या 40 वर्षांपासून ही शाखा इथे आताच ही कारवाई का होतेय? जाणून बुजून आणि सूडाच्या भावनेनं ही कारवाई करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केली.