मुंबई | 29 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. अमरावतीत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आंदोलन केलं. तर माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी भिडे यांचा गुरु नेमका कोण आहे हे समोर येणं गरजेचं आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. संभाजी भिडे यांच्यावरती देशद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आज आम्ही मुंबईतील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसोबत पत्र व्यवहार केलेला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी केली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
संभाजी भिडे कधी बाबासाहेब आंबेडकरांवर बोलतात. कधी महात्मा गांधींवर बोलतात. कधीही कुणावरही काहीही बोलतात. काहीही वक्तव्य करतात. कुणाबाबतही कशीही वक्तव्य करायची आक्षेपार्ह विधानं करतात आणि हे मोकाट फिरतात, हे चालणार नाही, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी ठणकावून सांगितलं आहे.
आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने वागणं बरोबर नाही. संभाजी भिडे यांचा बोलवता धनी कोण हे कळालं पाहिजे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
मणिपूरमधील एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरच्या बाबतीमध्ये सरकार संवेदनशील नाहीये. केंद्र सरकार संवेदनशील नाही आणि त्यामुळे आम्ही काँग्रेसचे नेते सोमवारी 31 तारखेला मशाल मोर्चा काढणार आहोत. रेडिओ क्लबपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा असणार आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगतलं आहे.
मुंबईत एक किलोमीटर सरळ रस्ता दाखवा. मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. पाणी स्वच्छ येत नाहीये. गॅस्ट्रोची समस्या आहे. सर्दी, खोकला, तापाने मुंबईकर बेजार झालेले आहेत. पालिकेमध्ये मंत्री कॅबिन एन्क्रोचमेन्ट करण्यामध्ये व्यस्त आहेत, कब्जाराज सुरू आहे. पालिका आयुक्तांचं लक्ष नाहीये. लेप्टोची साथ वाढते आहे. रुग्णालयात पेशंटची संख्या वाढते आहे. याकडे कुणाचं लक्ष नाही, असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मुंबई बकाल होत चालली आहे आणि नेते फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत. महानगरपालिकेचा शून्य कारभार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, असा आरोपही त्यांनी केला आहे.