मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गट मोदीभक्त झाला आहे. टीका करण्याखेरीज त्यांच्याकडे काहीही काम नाही. एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्क्रिप्ट वाचतात. एकनाथ शिंदे यांना कावीळ झाली आहे म्हणून त्यांना सगळं पिवळं दिसतंय, असा घणाघात विनायक राऊत यांनी केलाय.
हिंदी गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नावाची कावीळ झाली आहे, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय याची पोटदुखी भाजपला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपने सावरकरांचा जयघोष करण्याचा ठेका घेतलेला नाहीये. बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांची शिवसेना असेल. यांनी सावरकरांच्या बाबत कायमच हिरीरीने आपली भूमिका मांडली आहे, असं विनायक राऊत म्हणालेत.
हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटावं आणि वीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करून घ्यावा, असं आव्हानच विनायक राऊत यांनी शिंदेंना दिलं आहे.
नवीन संसद भवनाची जी इमारत आहे ती भव्य दिव्य आहे विक्रमी काळामध्ये पूर्ण झाली आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक आहे. पण राष्ट्रपती-उपराष्ट्रपती यांच्या हस्ते जर उद्घाटन झालं असतं तर तुमचं काय गेलं असतं? ही लोकशाहीची अवहेलना आहे, असं म्हणत राऊत यांनी नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे.
सेंगोलला संसदेचा अर्थ लावणं, लोकशाहीत बिघाड होऊ नये. याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. पण मग त्याचं पावित्र राखण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
सावरकरांवर जे जे टीका करतात त्यांना खडे बोल सुनावण्याचं काम उद्धव ठाकरे करतात. ही हिंमत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही. जनतेने कर्नाटकात तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. शंभूराजे काय किंवा उदय सामंत काय… एक डझन वेळा बोलले की, सगळे नेते आमच्या संपर्कात आहेत. हे बोलके पोपट आहेत. यांच्या बोलण्याला काहीही किंमत नाही, असंही विनायक राऊतांनी म्हटलं आहे.