बंगळुरु : राजकीय कारकीर्दीमध्ये खासदार होण्याचं प्रत्येक नेत्याचं स्वप्न असतं. पण खासदार झाल्यानंतर सध्याचं जे पद आहे, ते सोडावं लागतं. याला भाजपचे नवनिर्वाचित खासदार एस मुनीस्वामी अपवाद आहेत. खासदार म्हणून निवड झाल्यानंतरही त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये कुडुगोडी वॉर्डाचे ते नगरसेवक आहेत. खासदार झाल्यानंतर राजीनामा देण्याबाबत कर्नाटक महापालिका कायद्यात कोणतीही तरतूद नाही, म्हणून राजीनामा देणार नाही, असं मुनीस्वामी यांनी म्हटलंय.
खासदार झाल्यानंतर नगरसेवकपदावर राहू शकत नाही असा एकही कायदा नाही. मला राजीनामा देण्याची कोणतीही गरज नाही. मी फक्त नगरसेवक म्हणून मिळणारा पगार आणि भत्ता बंद करणार आहे, अशी प्रतिक्रिया मुनास्वामी यांनी दिली.
मुनीस्वामी यांच्या निर्णयानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत नगरसेवक होण्यासाठी रांगेत बसलेले नेते यावर नाराजी व्यक्त करत आहेत. मुनीस्वामी निवडून आलेला कोलार मतदारसंघ सर्वात मागास भागांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांनी मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे.
भाजपच्या मुनीस्वामी यांनी काँग्रेसच्या केएच मुनीयप्पा यांचा पराभव केलाय. मुनीयप्पा आतापर्यंत सात वेळा खासदार राहिलेले आहेत. मुनीस्वामी यांनी सात वेळा खासदार राहिलेल्या मुनीयप्पा यांचा 2.1 लाख मतांनी पराभव केला. नगरसेवक असताना खासदार झालेले मुनीस्वामी कर्नाटकातील यावेळचे पहिले खासदार आहेत. पण त्यांची दोन्ही पदांवर राहण्याची इच्छा आहे.