भररस्त्यात कुऱ्हाडीने वार, नागपुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

| Updated on: Aug 16, 2020 | 4:18 PM

देवा उसरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भररस्त्यात कुऱ्हाडीने वार, नागपुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या
Follow us on

नागपूर : काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांच्या हत्येने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. कुऱ्हाडीने वार करुन दोघांनी त्यांची हत्या केली. भारत टॉकीजजवळ आज (रविवार 16 ऑगस्ट) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. (Nagpur Ex Congress Corporator Deva Usare killed)

देवा उसरे हे नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात राहतात. नेहमीप्रमाणे ते सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. टपरी शेजारी दुचाकी लावली तोच दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

कुऱ्हाडीचे जोरदार घाव वर्मी बसल्याने उसरे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पलायन केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उसरे यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

देवा उसरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून त्यांची हत्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवा उसरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. (Nagpur Ex Congress Corporator Deva Usare killed)