नागपूर : राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी उद्या 1 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात देखील उद्या मतदान पार पडत आहे. कोरोनाच्या सावटाखाली ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशा परिस्थितीतही प्रशासनाच्यावतीने सगळी तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांनी मतदान करताना काय काळजी घ्यायची आहे आणि मतदान कशा पद्धतीने करायचं आहे तसंच प्रशासनाची तयारी कुठपर्यंत झाली आहे याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. (nagpur Graduate And teacher Constituency Elction)
“कोरोनामुळे मतदान केंद्रावर आधीच तयारी करून ठेवण्यात आली आहे. मतदार मतदान केंद्रावर येताच त्यांचं तापमान मोजण्यात येईल. त्याला ताप आहे का हे बघण्यात येईल. मास्क घातलं नसल्यास त्याला मास्क देण्यात येईल. सॅनिटायझर, ग्लोज मतदान केंद्रावर ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
“मतदारांनी सोबत पेन आणि मोबाईल आणू नये. आणल्यास तो बाहेर ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या पेननेच मतदान करायचं आहे. मतदान करताना इंग्रजी मराठी आणि रोमन भाषेत आकडे लिहिता येणार आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
पदवीधर मतदारसंघासाठी नागपुरात 165 मतदान केंद्र आहेत. 38 झोनल ऑफिसर असून ते संपूर्ण मतदान सामग्री घेऊन पोलीस पथकासह रवाना झाले आहेत. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात होणार आहे तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागपूर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदार पॉझिटिव्ह असला तरीही त्याला मतदान करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात पॉझिटिव्ह व्यक्तीला मतदान करता येणार आहे. तसंच मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे.
(nagpur Graduate And teacher Constituency Elction)
संबंधित बातम्या