नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी? सुधाकर आडबालेंच्या प्रचारासाठीच्या बैठकीत ‘या’ दोन पक्षांना निमंत्रणच नाही

| Updated on: Jan 18, 2023 | 9:10 AM

नागपुरातून महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात असल्याचं चित्र आहे.

नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी? सुधाकर आडबालेंच्या प्रचारासाठीच्या बैठकीत या दोन पक्षांना निमंत्रणच नाही
Image Credit source: social media
Follow us on

गजानन उमाटे, नागपूरः नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार इथे निवडणूक लढवताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे कुणाच्या पाठिशी उभे राहणार,या बद्दल अद्याप एकमत नसल्याचं चित्र आहे. त्यातच काल सुधाकर आडबालेंच्या (Sudhakar Adbale) प्रचाराकरिता झालेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.

वडेट्टीवार यांच्या घरी बैठक

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत गोंधळ कायम असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे नेते सुधाकर आडबाले यांच्या प्रचारासाठी बोलावलेल्या बैठकीचं ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला निमंत्रण मिळालं नसल्याचं समोर आलंय. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घरी काल ही बैठक पार पडली. या बैठकीला सुनील केदार, विजय वडेट्टीवार, आ. अभिजित वंजारी, बबनराव तायवाडे आदींची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे घटकपक्ष ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय.

महाविकास आघाडीचे 3 उमेदवार

नागपुरातून महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे सुधाकर आडबाले यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर शिक्षक भारती संघटनेकडून राजेंद्र झाडे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिक्षक भारती ही संघटना कपिल भारती यांची असून ती महाविकास आघाडीचाच एक भाग आहे. तर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सतीश इटकेलवार यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. आता या तिघांपैकी महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण, यावरून गोंधळ पहायला मिळतोय. भाजपतर्फे नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलाय.

सतीश इटकेलवारांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार यांच्या नव्या दाव्याने नागपुरात चांगलीच खळबळ उडाली आहे. माझ्यामागे अदृश्य शक्तींचा हात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मीच जिंकणार आहे, असा दावा त्यांनी केलाय. ही अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे, यावर त्यांनी स्पष्ट संकेत दिले नाहीत. मात्र महाविकास आघाडीतील सगळेच घटक पक्षाचा माझ्या पाठिशी हात आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मी भाजापाचा पाठिंबा मागणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलंय. सतीश इटकेलवार यांच्या दाव्याने नागपुरात नव्याच चर्चांना उधाण आलंय.